भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. श्री कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे ह्या दिवशी शिवलिंगावरती तसेच सभामंडप व परिसरामध्ये आकर्षक विविध रंगीबेरंगी फुलांची सजावट व श्री कृष्णांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
गेले दोन तीन दिवसांपासुन भीमाशंकर व परिसरामध्ये वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. चौथ्या सोमवारची गर्दी पाहता शनिवार व रविवार गर्दी मोठ्या प्रमाणात होती. सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सकाळपासूनच गर्दी अत्यंत विरळ होती. सोमवार (दि.२९) रोजी पहाटे साडेचार वाजता मंदीर उघडण्यात आले गाभारा मंदिर व परिसराची साफसफाई झाल्यानंतर पाच वाजेच्या दरम्यान शिवलिंगावरती जलाभिषेक करुण पुजा करण्यात आली यानंतर महाआरती झाल्यानंतर लगेचच मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारी एक वाजे पर्यंत गर्दीचा ओघ हा आंबेगाव व खेडच्या हद्दी पर्यंत होता यानंतर गर्दी कमी होत गेली. वादळी वारे व मुसळधार पडणार्या पावसामुळे येणारे भाविक हे दर्शन करून लगेच परतीच्या मार्गावर परतत होते. शिरूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चौथ्या श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. अनिल लबडे मिञ परिवार मंचर यांच्यावतीने ४०० किलो विविध रंगांच्या फुलांचा वापर करुन श्रीकृष्ण व विविध गोपालांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये झेंडू अस्टर चमेली शेवंती डीजी गुलछडी झिनी अशा रंगीबेरंगी फुलांचा वापर करून गाभारा सभा मंडप व परिसर सजविण्यात आला आहे.