भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री क्षेत्र भीमाशंकर तिर्थक्षेत्र असलेल्या भीमाशंकर येथे नाताळ सुट्टी ते नववर्षाचा पहिला या दिवसांदरम्यान ”ओम नमः शिवाय“ च्या जयघोषात लाखो भाविक बोचरी थंडीत पवित्र शिवलिंगाच्या दर्शना बरोबर पर्यटनाचा आनंद लुटत होते. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. गर्दीमुळे दर्शनरांग बसस्थानकापर्यंत जाऊन पोहचली होती. अशीच गर्दी नाताळच्या शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी पाहायला मिळाली.
जुन्या वर्षात चौथा शनिवार व रविवार व दि.२३ पासूनच भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पुणे, मुंबई, अहमदनगर,नाशिकसह परराज्यातील लोक मोठ्या संख्येने आले होते. त्यात मंदोशीमार्गे भीमाशंकरचा रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे वाहतूक मंचर-घोडेगाव-भीमाशंकर मार्गे सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. वाहनतळ ही सलग पाठोपाठ दोन तीन व त्यानंतर चारही फुल झाली होती. एसटी महामंडळाच्या बस उपलब्ध न झाल्यामुळे वाहतुकीचे नियोजन ढासळले. कोंढवळ फाटा ते भीमाशंकर असे काही भाविकांना तीन ते चार कि.मी.पायी चालत दर्शनासाठी जावे लागत होते. यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. भीमाशंकरकडे येताना पोखरी घाटातून डिंभे धरणाचे विहंगम दृष्य दिसत असल्याने येथेही मोठ्या संख्येने पर्यटक थांबत आहेत.
खेड, आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे व पुणे जिल्हातील एकमेव शिवज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकरला १९८५ मध्ये सरकारने १३० चौरस किलोमिटर परिसर अभयारण्य म्हणून जाहीर केला आहे. या परिसराच्या सौंदर्याची ओळख मानवी मनाला भूरळ घालते. अभयारण्य परिसरात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा दिसणारे घनदाट जंगल असून या घनदाट जंगलातून येणारे किडे, पक्षी व प्राणी यांचे आवाज हृदयाचे ठोके वाढविल्याशिवाय राहत नाही. भव्य दिव्य हेमाडपंथी शिवमंदीर पाहील्यानंतर भक्त शिवलींगाच्या दर्शनासाठी अधीर होवून जातात.
भीमाशंकर हे हेमाडपंथी असून सुमारे ७४० वर्षापूर्वी बांधलेले आहे. मंदीरावर दशावतारातील नयन मनोहर मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदीर परीसरात मोक्षकुंड, भिमकुंड, कळमजातळे अशी पवित्र कुंडे आहेत. श्री कमलजामाता, साक्षी विनायक, गुप्त भीमाशंकर, श्री हनुमान, श्री अंजनामाता यांची मंदिरे आहेत. तसेच येणा-या पर्यटकांसाठी नागफणी, कोकणदर्शन ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. अभयारण्यातील जंगलात जांभुळ, हिरडा, पिसा, अंजनी, चेहडा, उंबर, आंबा, शेंद्री अशी प्रचंड प्रमाणात विस्तारलेली झाडी व कारवी, लोखंडी, लोहारी अशी झुडपे आहेत. त्याच प्रमाणे सांबर, आंबा, चिंगर, कालाकुडा, पांढरा, माळया अशा अनेक वनऔषधी वनस्पती या ठिकाणी आढळतात. या अभयारण्यातील मोठी खार ही ”शेकरू“ या नावाने ओळखली जाते ही खार दुर्मिळ असुन जंगलाचे वैशिष्टे आहे. जंगलात सांबर, रानडुकरे, साळीदर, रानमांजर, ससे हे प्राणी व वेगवेगळया जातीच्या असंख्य पक्षी येथे आढळतात. श्री क्षेत्र भीमाशंकरला देशाच्या कानाकोप-यातुन अनेक भाविक व पर्यटक नाताळ सुट्टी ते नवीन वर्षातील पहिला दिवस तसेच शालेय सहली यामुळे लाखो भाविक, विद्यार्थी व पर्यटक दरदिवशी पवित्र शिवलिंगाच्या दर्शनबरोबर येथील निसर्गसौदर्य पहाण्यासाठी मोठया प्रमाणात येत आहे.
मंदिरात दर्शन लवकर व्हावे ह्या साठी नियोजनबद्ध व्यवस्था केली होती. यामध्ये दर्शनपास व्ही आय पी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. भीमाशंकर येथे येणा-या भाविकांना मंदिर परिसरामध्ये व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्ञी गवांदे,विश्वस्त दत्ताञय कौदरे, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे भोरगिरी ग्रामपंचायत सरपंच दत्ताञय हिले प्रयत्न करत होते. तर वाहन तळाचे नियोजन तसेच मुख्य रस्त्यावरती कुठे ही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिस हवालदार तेजस इष्टे, रमेश काठे, देविदास कुटे, विठ्ठल वाघ, गणेश केदार एस टी महामंडळाचे देवराम लोहकरे होमगार्ड युवराज केंगले दिवसभर नियोजन करत होते.