पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने श्री गणेश अथर्वशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यापीठाने याला मान्यता दिली आहे. या ऑनलाइन अभ्यासक्रमात एक अर्ज भरल्यानंतर २१ दिवस २१ चौकटी ऑनलाइन दिसणार असून, नंतर त्यावर आधारित प्रश्नांना उत्तरे देऊन ती ऑनलाइनच सादर करायची आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट व लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, संस्कृत विभाग हेही या अभ्यासक्रमातील सहयोगी आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम नि:शुल्क आहे. कोणीही त्यात सहभागी होऊ शकते. विद्यापीठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने हा अभ्यासक्रम तयार केला आहे. २१ दिवसांच्या २१ व्हिडीओ लिंकमध्ये त्याची रचना तयार करण्यात आली आहे. श्लोकांचे निरुपण, त्यावर आधारित प्रश्न, त्याची उत्तरे, ती सबमीट केल्यानंतर आकर्षक प्रमाणपत्र ऑनलाइनच मिळणार आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी कालमर्यादेचे बंधन नाही.
अभूतपूर्व संपूर्ण नि:शुल्क उपक्रम, व्यक्तिमत्त्व विकासाचा आलेख-मन:शांतीचा राजमार्ग अशा शब्दांत यासंबंधीच्या परिपत्रकात या अभ्यासक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमासंबंधीचे परिपत्रक कोणालाही विविध माध्यमांतून पाठवण्याची मुभाही देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या वतीने प्रथमच अशा पद्धतीचा, इतक्या कमी मुदतीचा अभ्यासक्रम मान्यता देऊन सुरू करण्यात आला असल्याने त्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. त्यात धार्मिक काहीच नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे तर भाषेच्या आडून धार्मिकता शिकवण्याशिवाय यात दुसरे काय आहे, असेही बोलण्यात येत आहे. संवेदनशील विषय असल्याने यावर थेट नाव घेऊन बोलायला कोणीच तयार नाही. विद्यापीठ प्रशासनाने मात्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, त्यामुळेच त्याला मान्यता दिली असल्याचे सांगण्यात आले.
संस्कृत भाषेची माहिती व्हावी हा उद्देश
संस्कृत भाषेसंबंधी आत्मियता, जिव्हाळा निर्माण होऊन ती शिकण्याची इच्छा प्रबळ व्हावी म्हणून प्रशासनाने या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. भारतीय संस्कृतीची माहिती करून देण्याच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत संस्कृत प्राकृत विभागाने हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यात कोणताही धार्मिक दृष्टिकोन नाही तर भाषिक, त्यातही संस्कृत भाषेची माहिती व्हावी हा उद्देश आहे. - डॉ. पराग काळकर, अधीक्षक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग.