प्रज्ञा केळकर- सिंग
पुणे : कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. पुण्यात आजपर्यंत ओमायक्रॉनच्या ७८ रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, यापैकी एकाही रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज भासलेली नाही. त्यामुळे या व्हेरियंटच्या प्रसाराचा वेग जास्त असला तरी काही दिवस केवळ सौम्य लक्षणे दिसून सहा-सात दिवसांत रुग्ण पूर्ण बरे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुमारे ४० रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत.
दुसऱ्या लाटेतील संसर्गास कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग पाच पटींनी जास्त आहे. त्यामुळे सध्या झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांना ओमायक्रॉनचाच संसर्ग झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही संसर्ग होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. सध्याच्या कोरोनाबाधितांमध्ये ८५-९० टक्के रुग्णांना ओमायक्रॉनची, तर १०-१५ टक्के रुग्णांना डेल्टा व्हेरियंटची बाधा होत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यातही प्रामुख्याने लसीकरण पूर्ण न झालेल्यांमध्ये डेल्टाचा संसर्ग अधिक प्रमाणात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे.
ओमायक्रॉनचा संसर्गाचा वेग अधिक असला तरी व्हेरियंटची फुप्फुसांवर हल्ला करण्याची क्षमता डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. हा विषाणू प्रामुख्याने श्वसननलिकेमध्येच राहतो. त्यामुळे रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत नाहीत किंवा ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज भासत नाही. कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविल्यावर चार-पाच दिवसांनी अहवाल प्राप्त होतो. तोपर्यंत रुग्णाचा विलगीकरणाचा निम्मा कालावधी झालेला असतो. राज्य शासनाच्या सूचनेनुसार, सलग तीन दिवस कोणतीही लक्षणे नसतील तर दहाव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करून ती निगेटिव्ह आल्यावर रुग्णांना घरी सोडले जात आहे.
''पुणे शहरात आतापर्यंत ७८ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एकाही रुग्णामध्ये आजाराने गंभीर स्वरूप धारण केलेले नाही किंवा कोणालाही ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज भासलेली नाही. यापैकी सुमारे ४० रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याचे पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.''