पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची शेतकऱ्यांचा नेता म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरणारा, अधिकाऱ्यांना झगडणार आणि मंत्रालयाच्या पायरा झिजवणारा नेता म्हणून ते परिचीत आहेत. सध्याच्या राजकीय वर्तुळात मोजक्याच नेत्यांची उदाहरणे दिली जातात, त्यात राजू शेट्टींचंही नाव घेतलं जातं. म्हणूनच ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतकरीपुत्र राजू शेट्टींचा आदर करतात, त्यांना मनातून मानतात. याचीच प्रचिती पुण्यात दिसून आली. यासंदर्भात राजू शेट्टींनी फेसबुक पोस्टवरुन माहिती दिली आहे.
पुणे येथे काल साखर आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी जात असताना पुणे रेल्वे स्टेशनजवळ माझी गाडी पाहून मला फोन आला. “साहेब मी साता-याहून IAS ओंकार पवार बोलतोय, मला आपणांस भेटायचं आहे. यानंतर ओंकारची साखर आयुक्त कार्यालयात भेट झाली. नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगात ओंकारने बाजी मारली. आधी IPS व परत IAS या दोन्ही परिक्षा पास होणाऱ्या ओंकारला पाहिल्यानंतर मन भरून आले. कारणही तसंच होतं, ज्यावेळेस त्याने माझी भेट घेऊन आशिर्वाद घेत असताना तो म्हणाला की, साहेब माझे वडील चांगले शेतकरी आहेत व मीही शेती करतच IAS झालो. त्यावेळी त्याचा पेढा भरवून सत्कार केला व ओंकारला सांगितले “ओंकार तू शेतकऱ्यांना विसरू नकोस हिच माझ्यासाठी गुरु दक्षिणा असेल !, अशी फेसबुक पोस्ट राजू शेट्टींनी लिहिली आहे.
दरम्यान, मला खात्री आहे शिवारात मशागत करणारा ओंकार निश्चीतच प्रशासनात सर्वसामान्य जनतेच्या सेवेच्या माध्यमातून आई-वडिलांच्या संस्काराचे व स्वत:च्या कतृत्वाचे चांगले पिक आणेल, असा विश्वासही राजू शेट्टींनी व्यक्त केला.