पिंपरी : ‘ऑन ड्युटी’ असताना अस्वस्थ वाटायला लागल्याने पोलीस कर्मचारी पोलीस चौकीत विश्रांती घेत होता. दरम्यान त्याची तब्येत बिघडल्याचे निदर्शनास आल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. शिरगाव पोलीस चौकीत रविवारी (दि. ८) दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली.
शिरगावच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक दिलीप दत्तराव बोरकर (वय ३६), असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मागे, आई-वडील, पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील असलेले दिलीप बोरकर हे २००७ मध्ये पुणे शहर पोलीस दलात रुजू झाले होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यापासून ते शहर पोलीस दलात कार्यरत होते. सध्या शिरगाव पोलीस चौकी येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते वाकड पोलीस लाईन येथे राहात होते. ते रविवारी ‘ऑन ड्युटी’ असताना शिरगाव पोलीस चौकीत नेहमीप्रमाणे काम करीत होते.
दरम्यान, दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे पोलीस चौकीतील एका खोलीत ते विश्रांती घेत होते. त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. हृद्यविकाराच्या झटक्याने दिलीप बोरकर यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे डाॅक्टरांनी सांगितले. दिलीप बोरकर हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होते. तसेच त्यांनी पोलीस खात्यांतर्गत पूर्वपरीक्षा दिली होती.