पुणे: तब्बल अठराशे बेडचे पश्चिम महाराष्ट्रातील ससून रुग्णालय सांभाळण्यासाठी सक्षम अधिष्ठाता हवा, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचे अनेक वर्षे उपअधिष्ठाता म्हणून काम केलेल्या डाॅ. विनायक काळे यांची ससूनच्या अधिष्ठातापदावर नियुक्ती केली. त्यावेळी ससून रुग्णालयाला त्यांच्या अनुभवाचा फायदा हाेऊन रुग्णालयाची सेवा सक्षम हाेईल, असे वाटले हाेते; परंतु ससूनमध्ये एकामागाेमाग अनेक गैरप्रकरणांमुळे ससून रुग्णालयाचे नाव चर्चेत आल्याने तसेच दाेन वर्षांतच सात वेळा वैद्यकीय अधीक्षक बदलल्याने डाॅ. काळे यांचे रुग्णालयातील विभागांवर नियंत्रण नसल्याचे समाेर आले. त्यावरून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची चर्चा ससून व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सुरू आहे.
डाॅ. काळे यांची ससून रुग्णालयात प्रथम ८ एप्रिल २०२२ मध्ये नियुक्ती केली हाेती. त्यानंतर राजकीय वजन वापरून डाॅ. संजीव ठाकूर यांनी डाॅ. काळे यांचा पत्ता कट करून जानेवारी २०२३ मध्ये ससूनचा अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळातच ललित पाटील ड्रग प्रकरण घडले. दरम्यान, डाॅ. काळे हे पुन्हा अधिष्ठाता पद मिळावे, यासाठी प्रशासकीय न्यायाधिकरणात गेले, पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने डाॅ. काळे यांना पुन्हा नाेव्हेंबर २०२३ मध्ये अधिष्ठातापदाच्या खुर्चीवर बसवले. तेव्हापासून डाॅ. काळे हे ससून रुग्णालयाचे पद सांभाळत आहेत.
दरम्यान, मध्यंतरी यांच्या कार्यकाळातच गेल्यावर्षी थर्टी फर्स्टला ऑर्थाे विभागाच्या निवासी डाॅक्टरांची रंगलेली पार्टी, दाेन महिला निवासी डाॅक्टरांवर झालेले रॅगिंग प्रकरण, उंदराने आयसीयूमध्ये रुग्णाचा घेतलेला चावा आणि आता अपघातातील अल्पवयीन आराेपीचे बदललेले रक्त अशी एकामागाेमाग एक गंभीर प्रकरणे घडत गेल्यामुळे ससून रुग्णालयाचे नाव खराब झाले आणि त्यावरून डाॅ. काळे यांचे रुग्णालयावर नियंत्रण नसल्याचे समाेर आले.
यापैकी रक्ताचा अहवाल बदलण्याचा खूप गंभीर प्रकार उघडकीस आला. त्यावरून दाेन डाॅक्टरांना अटकही झाली. परंतु, ही माहीती त्यांना खरेतर रुग्णालयातील यंत्रणेकडून समजणे अपेक्षित हाेते. मात्र, ती माहिती त्यांना माध्यमांकडून समजली, असे त्यांनी स्पष्ट केले हाेते. तसेच, याप्रकरणी त्यांनी या प्रकरणाची ना चाैकशी करण्याचा निर्णय घेतला ना काही कारवाई केली. त्याचबराेबर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी डाॅ. अजय तावरे यांना अधीक्षकही केले. अशा एक ना अनेक प्रकरणांमुळे काळे निष्क्रिय असल्याचे समाेर आले.
रुग्णसेवा वाऱ्यावर
ससून रुग्णालयात दरदिवशी हजार ते पंधराशे रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात तर, दरराेज तितक्याच रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार सुरू असतात. अधिष्ठाता म्हणून रुग्णसेवा बराेबर हाेते की नाही हे पाहण्यासाठी डाॅ. काळे यांनी दरराेज राऊंड घेणे अपेक्षित हाेते. मात्र, ते देखील ते करत नव्हते तसेच महिन्यातून अनेक दिवस रजेवर असत, आदी कारणांमुळे डाॅ. काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.