पुणे : लक्ष्मीपूजनाला संध्याकाळपासूनच सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. फटाक्यांच्या धुरामुळे रस्त्यावर फिरणेही अवघड झाले होते. अनेक भागात नागरिकांनी रस्त्यावरच फटाके फोडल्यामुळे गाडी चालवणाऱ्यांना जीव सांभाळत पुढे जावे लागत होते. प्रदूषणामुळे पुणेकरांचा अक्षरशः श्वास कोंडल्याचे चित्र शहरभर होते.
ज्येष्ठ नागरिकांना तसेच आधीपासूनच श्वसनविकार असलेल्यांना या फटाक्यांच्या धुराचा त्रास झाला. दिवाळीच्या उत्सवात आनंद साजरा करण्यासाठी फटाके वाजविले जातात. इमारतीच्या आवारातच रहिवासी फटाके वाजवितात. या फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर बाहेर जाण्यासही जागा नसते. त्यामुळे घरांमध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणात ही विषारी हवा दीर्घकाळ राहते. या हवेच्या दीर्घकाळ संपर्कात आल्याने नागरिक आजारी पडतात.
प्राण्यांना होतोय त्रास
फटाक्यांना घाबरून कुत्रा, मांजर यासारख्या प्राण्यांना त्रास होताना दिसत आहे. भयभीत होऊन ते आडोशाला, गाडीखाली, पार्किंगमध्ये आश्रय घेत आहेत. काही प्राणी तर भाजून जखमी झाल्याचे समोर आले आहे. अशा वेळी त्यांच्यावर उपचार करायलाही कुणी नसल्याने जगणेही अवघड झाले आहे. तसेच आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांमुळे पक्षांनाही त्रास होत आहे. अनेक पक्षांचा तर जीव गेल्याचा घटनाही या काळात घडत आहेत.
दिवाळीचा उत्साह अन् आजारांना आमंत्रण
दिवाळीच्या उत्साहात नागरिक एकामेकांना भेटून शुभेच्छा देत आहेत. सर्वत्र फराळ, गोडधोड पदार्थांची धामधूम सुरु आहे. अशातच जीवघेणे फटाके आजारांना आमंत्रण देत आहेत. फटाक्यांचे आवाज, धूर शरीरासाठी हानिकारक असल्याचे दिसून आले आहे. धुरामुळे श्वसनाचे आजार, दमा, खोकला, फुफ्फुसाच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. फटाके कमी करणं आत गरजेचं असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.