राखीपौर्णिमेलाच लाडक्या बहिणांना पंधराशेची भेट; राज्य आर्थिक संकटात, विरोधकांचा आरोप चुकीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:33 PM2024-07-11T12:33:02+5:302024-07-11T12:33:46+5:30

विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे लाडकी बहीण योजनेचे अर्ज देऊ नका, असे कोणी सत्ताधारी नेते म्हणत असतील तर ते चुकीचे आहे

On Rakhipurnima start mukhyamantri majhi ladki bahini yojana in maharashtra | राखीपौर्णिमेलाच लाडक्या बहिणांना पंधराशेची भेट; राज्य आर्थिक संकटात, विरोधकांचा आरोप चुकीचा

राखीपौर्णिमेलाच लाडक्या बहिणांना पंधराशेची भेट; राज्य आर्थिक संकटात, विरोधकांचा आरोप चुकीचा

पुणे : लाडकी बहीण योजनेला (Mukhyamantri Majhi Ladki Bahini Yojana) लाभ येत्या राखीपौर्णिमेपासूनच सुरू होईल. राज्यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात त्यादिवशी प्रत्येकी पंधराशे रुपये जमा होतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ajit Pwar Group) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले. या योजनेमुळे राज्य आर्थिक संकटात जाईल, या विरोधकांच्या आरोपाला काहीही अर्थ नाही, असा दावाही पाटील यांनी केला. राज्यातील अटीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ होईल, असे ते म्हणाले.

योजनेची माहिती देण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी विरोधक कसलीही माहिती न घेता बोलतात, अशी टीका केली. शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, वैशाली नागवडे तसेच पक्षाचे अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलण्याइतका मी मोठा नाही, मात्र अजित पवार यांनी या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यापूर्वी ते बोलले आहेत हे लक्षात घ्यायला हवे.

राज्याने कर्ज काढण्याची मर्यादा अजून पार केलेली नाही. अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, तरुण, विद्यार्थी, अल्पसंख्याक अशा विविध घटकांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे लाडकी बहीण योजनेचे अर्ज देऊ नका, असे कोणी सत्ताधारी नेते म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. माता भगिनींना लाभ मिळणे गरजेचे आहे. मग तो कोणाच्यामार्फत मिळाला, तरी काही हरकत नाही, असे पाटील म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत कोणी कोणाबरोबर गेले म्हणून नुकसान झाले, असे होत नाही. जे असे बोलतात ते त्यांच्या पक्षात असे विश्लेषण करण्याइतके मोठे नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय अनेक पक्ष देशात भारतीय जनता पक्षाबरोबर आले-गेले आहेत. त्यामुळे आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला किंवा त्यांच्यामुळे आमचे नुकसान झाले, या आरोपांमध्ये काहीही अर्थ नाही. - उमेश पाटील, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

Web Title: On Rakhipurnima start mukhyamantri majhi ladki bahini yojana in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.