बारामती :कोयता हातात घेवुन सोशल मिडीयावर ठेवलेले छायाचित्र बारामतीकर युवकाला चांगलेच महागात पडले आहे.सोशल मिडीया सेल आणि सायबर क्राईमच्या पथकाने याबाबत पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांना माहिती दिली.त्यानंतर सबंधित २२ वर्षीय युवकाचा शोध घेत त्याच्यावर पोलीसांनी कारवाई केली आहे.
पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत माहिती दिली. कोयता गँग हा शब्द अलीकडच्या काळात खूप चर्चेत आला आहे. कोयता जवळ बाळगणे ,कोयता फिरवणे, कोयता घेऊन धुडगूस घालणे, आणि कोयतेचा डीपी ठेवणे या घटना आपण वारंवार पाहतो .या घटनांमधून नेहमीचा गुन्हा तर आहेच. परंतु कोयता बाळगुन समाजामध्ये दहशत निर्माण करणे ,समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेलाच हात घालणे इरादा दिसून येतो. त्यातून त्याची गुन्हेगारी मनोवृत्ती दिसून येते.त्यामुळे अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी हे सक्त कारवाई करण्याचे आदेश देत असतात.
अलीकडे कोयत्याचे डीपी किंवा इतर हत्यारा सह सोशल मिडीयावर ‘डीपी’ ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया सेल व सायबर क्राईम विभागातर्फे अशा घटनांवर नजर आहे. त्यामधुन हि माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली. अर्पित मोहिते किंग आॅफ बारामती या ‘इन्स्टाग्राम आयडी’वरुन कोयत्यासह ठेवलेल्या त्या युवकाचा फोटोची ‘पोस्ट’ निदर्शनास आली. ती गोयल यांनी तात्काळ बारामती शहर पोलिसांना फॉरवर्ड करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तात्काळ कारवाईबाबत पाठपुरावा केला. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाने तात्काळ संबधित युवकाचा शोध घेतला.
अर्पित सचिन मोहिते (वय २२, रा. एसटी स्टँडच्या पाठीमागे, इंदापूर रस्ता) याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. यावेळी अर्पित याने हौस म्हणून त्याने चार वर्षांपूर्वी काढलेला कोयत्या सोबतचा फोटो ‘क्रेज’ म्हणून स्वत:च्या इंस्टाग्राम वर ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४ ,२५ प्रमाणे कारवाई केली. तसेच त्या ठिकाणी घरात वळचणीला ठेवलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. संबंधित पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारे बारामती शहरांमध्ये कोणाच्याही डीपीवर गुन्हेगारी मजकूर, हत्यारे, खुन्नस शब्द याबाबतचे डीपी दिसून आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिला.