बारामती : अवैध दारू विक्री करणाऱ्यांची पोलिसांनी कुंडली तयार केली आहे. दारू विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर आणले आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती व इंदापूर तालुक्यातील २०० जणांवर लवकरच तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गावगावांतून दारू हद्दपार होण्यास मदत होणार आहे. याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी अधिक माहिती दिली.
त्यानुसार अवैध दारू विक्री प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कठोर कारवाई होणार आहे. वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिसांनी निंबूत येथे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्या प्रकाश चैनसिंग नवले (वय ५२) याच्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याच्या विरोधात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. त्याला या कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना आदेश दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे यांनी दिली.
वडगावचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी नवले याच्या विरोधातील प्रस्ताव तयार केला होता. नवले याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात २५ गुन्हे दाखल आहेत. हा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्याकडून मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यानंतर नवले याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. वडगाव निंबाळकर पोलिसांनी नवले याला येरवडा कारागृहात दाखल केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक लांडे यांच्यासह उपनिरीक्षक योगेश शेलार, सलिम शेख, सहायक फौजदार जगताप, हवालदार महेश बनकर, रमेश नागटिळक, दीपक वारुळे, अमोल भोसले, नितीन बोराडे, महादेव साळुंके, पोपट नाळे, अमोल भुजबळ, प्राजक्ता जगताप यांच्या पथकाने एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव दाखल करण्यास लक्ष घातले. दरम्यान, बारामती उपविभागात सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टीची दारू विकणाऱ्या २० जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईसाठी यादी बनविण्यात आली आहे. एकूण १५० दारू विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाने तिसरा डोळा उघडल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.