पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळात महापुरुषांनी लोकसहभागातून मोठी क्रांती केली. त्याचाच आदर्श घेत भारतातील महापुरुषांपैकी एक असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून पुण्यात ५ हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्यात आले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ तयार केली. मंगळवारी पहाटे ३ पासून मिसळ करण्याकरिता तयारी सुरु झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजता भव्य अशा कढई मध्ये सर्व पदार्थ व मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर सकाळी ७ वाजता संपूर्ण मिसळ तयार झाली. महात्मा फुले वाडा येथे अभिवादना करीता आलेल्या सर्व नागरिकांना मिसळ वाटप करण्यात आले.
उपक्रमामध्ये ५ हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी ५०० किलो, कांदा ३०० किलो, आलं १०० किलो, लसूण १०० किलो, तेल ३५० किलो, मिसळ मसाला १३० किलो, लाल मिरची पावडर २५ किलो, हळद पावडर २५ किलो, मीठ २० किलो, खोबरा कीस ७० किलो, तमाल पत्र ५ किलो, फरसाण १२०० किलो, पाणी ४००० लिटर, कोथिंबीर ५० जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी देखील ५ हजार किलो मिसळ तयार होणार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याकरिता दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ पासून पुणे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ५ हजार किलो मिसळ तयार करण्यात येणार आहे. तसेच तेथे अभिवादनाकरिता येणाऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.