पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधतीत पुण्यात भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्तीचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. चार दिवसीय असलेल्या या सामन्यात, राज्यभरातून अनेक मल्ल सहभागी होणार असून, मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी व रांगड्या मातीतील खेळाला चालना देण्यासाठी हे सामने आयोजित करण्यात आले आहेत.
राज्यभरातून कुस्तीप्रेमी व अनेक मातब्बर मल्ल या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून, आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ही हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, जे. एस. पी. एम. कॉलेज शेजारी, हांडेवाडी येथे पार पडणार आहे.
विशेष म्हणजे विजयी मल्लांसाठी रोख रकमेसह ठेवण्यात आलेली बक्षीसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम ५ लक्ष रुपये व चांदीची गदा मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांकास ३ लक्ष व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांकास २ लक्ष व सन्मान चिन्ह व चतुर्थ क्रमांकास १ लक्ष व सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची भव्य बक्षिसे प्रधान केली जाणार आहेत. याचसोबत विविध वजनी गटातील मल्लांसाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेच्या शिंदेगटाचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी दिली.
दरम्यान, भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने व परिषदेच्या नियमानुसार होणार असून, या स्पर्धेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन लाभणार आहे. राज्यभरातील कुस्ती प्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे मोठी पर्वणी असणार आहे.