एकीकडे विधीमंडळाचे आश्वासन; दुसरीकडे अजित पवार गटाची खेळी, पुण्यात मैत्रीपूर्ण लढत नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 05:46 PM2024-10-29T17:46:22+5:302024-10-29T17:47:09+5:30
पुण्यातील खडकवासला मतदार संघातून दत्तात्रय धनकवडे आणि वडगाव शेरी मतदार संघातून जगदीश यांची मैत्रीपूर्ण लढत होणार नाही
पुणे: पुण्यातील खडकवासला आणि वडगाव शेरी मतदार संघात होणाऱ्या मैत्रीपूर्ण लढती न होण्याच्या भूमिकेला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे फोन आल्यानंतर उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणूक न लढवण्याची ठरवले आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातुन भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक भाजपचा एबी फार्म घेऊन फॉर्म भरण्यासाठी गेले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा आदेश दिला. त्यामुळे मुळीक यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही.
खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी महापौर दत्ता धनकवडे यांना अधिकृतपणे ए बी फॉर्म देण्यात आला होता. त्यांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्ज भरू नका असा आदेश दिला. त्यानुसार धनकवडे यांनी अर्ज भरला नाही. आपल्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देउन मैत्रीपुर्ण लढत होउ नये याबाबत दबाव टाकण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अजित पवार गटाने ही खेळी खेळली असल्याचे समजते आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला.....
भाजपचे जगदीश मुळीक हे पक्षाचे अधिकृत एबी फार्म घेउन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणुक कार्यालयात आले होते. भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून जगदीश मुळीक यांना उमेदवारी अर्ज भरू नका असा आदेश दिला. महायुतीचा धर्म पाळल्याबददल मुळीक यांचे फडणवीस यांनी अभिनंदन केले. मुळीक हे विधीमंडळात दिसतील असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. त्यामुळे जगदीश मुळीक यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडुन पक्ष श्रेष्ठीकडुन आदेश न आल्यामुळे धनकवडे यांनीही उमेदवारी अर्ज भरला नाही. वडगावशेरी आणि खडकवासल्यात आपल्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देउन मैत्रीपुर्ण लढत होउ नये याबाबत दबाव टाकण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अजित पवार गटाने ही खेळी खेळली.
राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाने मला अधिकृतपणे एबी फाॅर्म दिला होता. पण पक्षाचे आदेश येत नाही तोपर्यत अर्ज भरायचा नाही असे पक्ष नेतृत्वाने सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरायचा नाही असा आदेश दिला. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज भरला नाही .- दतात्रय धनकवडे , माजी महापौर