पुणे: राज्यामध्ये एकीकडे तापमानाचा पारा चढत असताना दुसरीकडे वरुणराजाची हजेरी देखील लागणार आहे. रविवारपासून (दि. ७) ते ११ एप्रिलपर्यंत राज्यात गारपीट आणि पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट असेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, सोलापुरात सर्वाधिक कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर विदर्भातील बहुतेक सर्व शहरांचे तापमान चाळिशीपार होते.
उत्तरेकडून उष्ण व दमट हवा आपल्याकडे येत आहे. त्यामुळे राज्यातील तापमान चाळिशीपार जात आहे. राज्यात ७ ते ११ एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, हलक्या (वादळी वाऱ्यासह) पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेचा धोका पाहून घराबाहेर पडणे टाळावे आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
पूर्व विदर्भापर्यंत असलेली वाऱ्याची द्रोणिका रेषा विदर्भ, मराठवाडा, अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत जात आहे. कोकण गोव्यात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. विदर्भात १२ एप्रिलपर्यंत गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात ८ व ९ तारखेला ऑरेंज अलर्ट आहे. सोलापूर, नांदेड या ठिकाणी रात्री उकाडा जाणवेल. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती येथे ४८ तासांत उष्णतेची लाट येईल.
राज्यातील कमाल व किमान तापमान
पुणे : ३९.६ - १९.५सोलापूर - ४२.४ - २६.४
मुंबई - ३३.३ - २५.७परभणी - ४१.० - २६.२
नांदेड - ४०.२ - २५.६अकोला - ४१.५ - २५.३
अमरावती - ४१.० - २३.९चंद्रपूर - ४२.४ - २३.४
गोंदिया - ४०.० - २३.४नागपूर - ४०.६ - २४.२
वर्धा - ४१.५ - २७.२यवतमाळ - ४२.० - २६.०