- राजेंद्र मांजरे
राजगुरूनगर (पुणे) : खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील सख्ख सर्वांनाच माहीत आहे. त्यातच आधी विरोध मग दिलजमाई यांमुळे खेडमधील कार्यकर्ते नाराज झालेच, शिवाय पक्षांतरामुळेही नाराजीत भर पडली. मूळचा शिवसैनिक उद्धवसेनेसाेबत राहिला. या सर्व घडामोडीचा परिणाम म्हणजे महाविकास आघाडीचे खासदार अमोल कोल्हे यांना खेडमधून लक्षणीय आघाडी मिळाली.
खेड-आळंदी मतदारसंघातून गतवेळच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत राष्ट्रवादीची फूट होऊनही अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाले. शरद पवार यांना असणारी सहानुभूती, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असणाऱ्या सहानुभूतीचा फायदा अमोल कोल्हे यांना झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी यांचा रोष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. बियाणे, औषधे, अवजारे यावर लावण्यात आलेला जीएसटी, गॅस, पेट्रोल त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारात आलेली महागाई, शेतमालाच्या बाजारात होणारी घसरण यांमुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतींमुळे सरकारविरोधात प्रमाणात मतदान झाले.
तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग खेड तालुक्यात आहे. जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट झाली असली, तरी त्यांना मानणारा वर्ग कमी झाला नाही. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात केलेली कर्जमाफी यामुळे शेतकरी वर्गात ते लोकप्रिय होते. याचा फायदा अमोल कोल्हे यांना झाला. तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्गदेखील मोठ्या प्रमाणात तालुक्यात आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांत झालेल्या फुटीमुळे सर्वसामान्य जनतेच्या संतापाला अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव यांना सामोरे जावे लागले. तालुक्यात दांडगा संपर्क ही जमेची बाजू असतानादेखील त्याचा त्यांना फायदा झाला नाही. आढळराव हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, तसेच ऐन लोकसभेला जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सुटल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. ही बाब खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनता, तसेच शिवसैनिकांना रुचली नाही. त्यामुळे त्यांना पराभवाचा फटका बसला.
नरेंद्र मोदी यांच्या बदलत्या भूमिकांमुळे अल्पसंख्याक मतदार, तसेच ओबीसी मते खेचण्यात आढळरावांना अपयश आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली, पण अजित पवार गटाचे कार्यकर्तेदेखील अमोल कोल्हे यांच्या संपर्कात राहिले. त्याचा फायदा अमोल कोल्हे यांना झाला. आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी सुरुवातीच्या काळात आढळराव पाटील यांच्या प्रवेशाला केलेला विरोध, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहिते-पाटील यांची भेट घेऊन विरोध कमी केला. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन समजूत काढली, पण कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम हा दूर झाला नाही. नंतरच्या काळात आमदार मोहिते यांनी गावोगावी सभा घेऊन कार्यकर्त्यांना आदेशदेखील दिले, पण आम्ही निवडणुकीला तुमच्या सोबत राहू. या निवडणुकीत आम्हाला निर्णय घेऊ द्या, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
अमोल कोल्हे यांच्यासाठी अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, हिरामण सातकर, ॲड. राजमाला बुट्टेपाटील, अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, अमोल पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, संजय घनवट, तर काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष विजय डोळस यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तालुक्यात सर्वसामान्य मतदार विरुद्ध नेते, असे चित्र लोकसभा निवडणुकीत दिसून आले. गाव पातळीवर जनतेने स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घेत मतदान केले. स्थानिक पुढारी, गावपातळीवरील नेते यांचे सर्वसामान्य जनतेने ऐकले नाही.