पिंपरी :पुणे-मुबंई द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक वेगमर्यादा १०० ते ११० असतानाही अनेक वाहने त्यापेक्षा वेगाने धावतात. यामुळे अपघात घडतात. वाहनांमध्ये स्पीडोमीटरवर २०० ते २५० असे अंक दिलेले असतात. मुळात मर्यादेत वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन पळवणे हा अपराध आहे. मात्र, महामार्गावरील कॅमेरे चुकवून वाहने दामटली जात आहेत. वाहन बनवताना वेगमर्यादा आखून दिली तर अपघातांची संख्या घटू शकते.
पिंपरी चिंचवड शहराच्या शहरातून पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग तसेच बंगळूर-पुणे-मुंबई आणि किवळे मुंबई हा द्रुतगती महामार्ग जात आहे या रस्त्यांवर वेग-मर्यादाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे मात्र त्यावर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे वास्तव आहे.
ऑगस्टमध्ये झालेले अपघात..
पुणे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यामध्ये १०० पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. यात काही किरकोळ स्वरूपाचे आहेत तर काही गंभीर. यातील बहुतांश अपघात हे वाहन भरधाव पळवताना नियंत्रित न झाल्याने घडले आहेत. पुणे-नगर मार्गावर कार आणि ट्रकच्या धडकेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. ट्रक अचानक मधे आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. यासह नेते विनायक मेटे यांचा देखील मृत्यू रस्ते अपघातात झाला. तसेच द्रुतगती महामार्गावर सोमटणे फाट्याजवळ नीतेश राणे यांच्या वाहनाला मागच्या पंधरा दिवसांपूर्वी अपघात झाला होता. शहरात बंगळूर महामार्ग, देहूरोड, मोशी रोड परिसरात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अपघातात नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक वेगमर्यादा १०० किमी प्रति तास..
जिल्ह्यात पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर सर्वाधिक वेगमर्यादा १०० किमी प्रति तास एवढी आहे. सुरुवातीला ही वेगमर्यादा ८० किमी प्रती तास एवढी होती, त्यानंतर ती १२० किमी प्रती तास एवढी करण्यात आली होती. पण अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता १२० वरून पुन्हा १०० किमी प्रति तास एवढी वेगमर्यादा करण्यात आली. यासह ठरावीक किमीचे अंतर ठरावीक वेळेच्या आत वाहनाने पार केले तरी त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.