पुणे: आंतरराष्ट्रीय महिलादिना दिवशी पारगाव येथील नोकरदार लिपिक महिलेचा विहिरीत बुडून मृत्यु झाला आहे. सदर मृत्यु हा सुकृतदर्शनी आत्महत्या असल्याचे यवत पोलिसांनी म्हटले आहे. यमुना हनुमंत कारंडे (वय ४५ वर्षे राहणार पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे )असे त्या महिलेचे नाव आहे.
यमुना कारंडे यांचा मृतदेह पारगाव येथील शेतकरी सयाजी ताकवणे यांच्या शेतातील विहिरीमध्ये आढळून आला. यमुना या रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय पाटस व जय मल्हार विद्यालय देलवडी येथे क्लार्क पदावरती लिपिक म्हणून कार्यरत होत्या. यासंदर्भात त्यांचे पती हनुमंत कारंडे यांनी यवत पोलिसांना खबर दिली आहे. पती हनुमंत कारंडे हे जिल्हा बँकेच्या राहू शाखेमध्ये रोखपाल म्हणून कार्यरत आहेत. यमुना ह्या आपल्या मनमिळावू स्वभावासाठी परिसरात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या पाठीमागे वीस वर्षीय इंजिनियर मुलगी व अठरा वर्षीय बारावी शिकत असलेला मुलगा असा परिवार आहे. बुधवार दिनांक ८ रोजी दुपारी ३.०० वाजता पारगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांचा शोक हृदय पिळवटून टाकणारा होता.