पुन्हा 'योगायोग';अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एकत्र येणार
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: December 31, 2020 12:23 PM2020-12-31T12:23:52+5:302020-12-31T12:32:00+5:30
दोन्ही नेत्यांकडून कशी राजकीय फटकेबाजी केली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी पहाटेच्या वेळी अचानक शपथविधी उरकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र ते सरकार अवघ्या ८० तासांसाठी अस्तित्त्वात राहिले. त्यानंतर पुन्हा अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून अर्थ खात्याची महत्वाची जबाबदारी सांभाळत पवार यांचे काम धडाक्यात सुरु आहे. पण पुन्हा एकदा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एकत्र येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यातील कार्यक्रमात हे दोन दिग्गज नेते एकाच मंचावर उपस्थित असणार आहे. त्यावेळी नक्कीच दोन्ही नेत्यांकडून कशी राजकीय फटकेबाजी केली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चे लोकार्पण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी होणार आहे. १ जानेवारी,२०२१ रोजी या प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी चार वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण, वने व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट उपस्थित राहणार आहेत़ तसेच यावेळी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी आमदार उपस्थित असतील.
पवार- फडणवीस यांच्याबाबत या अगोदर दोनदा आला 'असा' योगायोग..
राज्यातील फडणवीस सरकार यांचे ८० तासांचे सरकार पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच माढा येथील लग्न समारंभात अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे शेजारी शेजारी बसलेले पाहायला मिळाले होते. तसेच त्यावेळी दोघांत हास्य विनोद झालेले देखील दिसले होते. तसेच दुसऱ्यांदा पवार आणि फडणवीस हे बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी एकत्र आले होते. त्यावेळी देखील अजित पवार व फडणवीस यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली होती.