पुणे : शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात दोन पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी पुन्हा एकदा पोलीस मुख्यालय चर्चेत आले आहे. आता येथे दोन महिलापोलिसांमध्ये चांगलीच जुंपली होती. या हाणामारीत जखमी झालेल्या पोलीस नाईक महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात ड्युटी बटवडा करणाऱ्या कर्मचाऱ्याला मदतनीस म्हणून काम करणाऱ्या पोलीस शिपाई महिलेने पोलीस नाईक महिलेला मारहाण केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.ड्युटी वाटप व त्यातून होणाऱ्या देवाण घेवाणीतून ही मारामारी झाल्याची जोरदार चर्चा आहे. संबंधित महिला सोमवारी सकाळी पोलीस नाईक ड्युटी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याला मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिला शिपायाकडे गेल्या होत्या. त्यावेळी दोघींमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पुढे त्या हातघाईवर आल्या. त्यांनी एकमेकींना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचा आरडाओरडा ऐकून मुख्यालयातील इतर कर्मचारी तेथे गोळा झाले. त्यांनी दोघींची भांडणे सोडवून जखमी पोलीस नाईक महिलेला रुग्णालयात नेले.या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली आहे. दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी झाली असून त्याची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येईल. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही,असे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले.गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे मुख्यालयातील सायबर पोलीस ठाण्यामधील दोन पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यावेळी २४ तासात या दोन्ही कर्मचाऱ्यांची सायबर पोलीस ठाण्यातून उचलबांगडी करुन त्यांना मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली होती.
पुन्हा एकदा पोलीस मुख्यालय 'चर्चेत' ! दोन महिलांमध्ये 'तुफान' हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 1:24 AM