पुणे : दोघांमधील वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा गुंडांनी गंज पेठेत दुचाकी वाहनांना आपले लक्ष्य केले़. गंज पेठेतील नाल्याजवळ पार्क केलेल्या ५ गाड्यांना कोणीतरी आग लावून पेटवून दिले़. त्यात या पाचही गाड्या जळून खाक झाल्या़. सुदैवाने अग्निशामक दलाची गाडी २ ते ३ मिनिटात तेथे पोहचल्याने ही आग तातडीने विझविली़. दुचाकीच्या मागच्या बाजूला असलेल्या टपऱ्या त्यात सापडून आग भडकण्याची शक्यता होती़. गंज पेठेतील लहुजी वस्ताद तालीमजवळ नाल्याशेजारी काही जणांनी आपल्या दुचाकी पार्क केल्या होत्या़. पहाटे सव्वा तीन वाजता कोणीतरी येथील पाचही दुचाकींना एकाच वेळी आग लावली़. याची खबर काही वेळाने अग्निशामक दलाला मिळाली़. अग्निशामक दलाच्या मुख्य केंद्रापासून हे ठिकाण जवळच असल्याने अग्निशामक दलाची गाडी तातडीने तेथे पोहचली़. तोपर्यंत या पाचही गाड्या ४० ते ४५ टक्के जळाल्या होत्या़. जवानांनी पाणी मारुन ही आग तातडीने विझविली़. या गाड्यांच्या मागे काही टपऱ्या होत्या़. या टपऱ्याच्या मालकांनी सरंक्षणासाठी वरच्या बाजूला पुढे बार उभारुन कापडे लावली होती़. गाड्यांना लागलेल्या आगीत ती कापडे जाळली़. त्यांचे बारही वितळले़ पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने अग्निशामक दलाला उशिरा माहिती मिळाली़. आणखी उशीर झाला असता तर आणि या टपऱ्याही पेटल्या जाण्याची शक्यता होती़. एकाचवेळी पाचही गाड्यांना आगी लागल्याने कोणीतरी ती जाणीवपूर्वक ही आग लावल्याची शक्यता अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी व्यक्त केली आहे़. फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत़.
पुण्यातील गंज पेठेत दुचाकी पुन्हा एकदा लक्ष्य ; ५ गाड्या पेटवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 3:41 PM
रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून गंज पेठेत दुचाकी वाहनांना आपले लक्ष्य केले़.
ठळक मुद्देदुचाकीच्या मागच्या बाजूला असलेल्या टपऱ्या त्यात सापडून आग भडकण्याची होती़ शक्यता सुदैवाने अग्निशामक दलाची गाडी २ ते ३ मिनिटात तेथे पोहचल्याने आग तातडीने विझविली़