पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाषणाचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात पाहिले जातात.हीच गोष्ट त्यांच्या मुद्देसूद भाषणाची ओळख अधोरेखित करणारी आहे. भाषणातील मुद्देसूदपणा त्यांचे व्हिडिओ पाहणाऱ्याला देखील सहज लक्षात येतो. पण लोकसभेनंतर ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचार सभा सुरु झाल्या. त्यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत एक वेगळीच अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी घडलेला एक गमतीशीर प्रसंग जयंत पाटील यांनी सांगितला आणि उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड येथे बुधवारी ( दि. ९) आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाटील यांनी ही अडचण प्रकटपणे बोलून दाखवली. यावेळी ते बोलत होते.यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, शिरूरचे आमदार अशोक पवार, माजी आमदार विलास लांडे, देवदत्त निकम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आदी उपस्थित होेते.
पाटील म्हणाले, डॉ.अमोल कोल्हे हे पुण्यात पाहिजे आहेत, त्यांना राज्यभर फिरवू नका अशी या भागात प्रचंड मोठी तक्रार माझ्या आणि पक्षाबद्दल होत होती. कोल्हे यांना आमच्याकडे सोडावे अशी आग्रही मागणी पुण्यातून पुढे येत होती. त्यावेळी तुम्ही थेट हेलिकॉप्टरमध्ये बसा आणि अजिबात मागे वळून बघू नका. कसल्या प्रकारची चिंताही करू नका. कोणाला काय ओरडायचं असेल ते ओरडू द्या. विधानसभेचे निकाल फक्त हाती आले की मग मात्र मी तुम्हाला मतदारसंघ सोडून कुठेही नेणार नाही, असे कोल्हे यांना सांगितले. जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्याबाबतीत सांगितलेल्या या गमतीशीर आठवणीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ..... आमच्या यशात त्यांचा वाटा मोलाचा... डॉ. अमोल कोल्हे हे आम्हाला प्रचारासाठी हवे होते. व्यासपीठावर ते असावेत यासाठी ओढाताण करावी लागत होती. मात्र त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला. कोल्हे यांना सोबतीला घेत आम्ही संपूर्ण राज्यभर फिरलो. त्यामुळे विधानसभेला आम्हाला जे काही यश मिळाले त्यात कोल्हेचाच मोठा वाटा आहे. ...................
..म्हणून कोल्हे यांना सभांना उपस्थित राहण्यासाठी आणि बोलण्यासाठी होतो आग्रह..
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या दमदार अभिनयाने घरोघरी ओळख निर्माण केली आहे. तसेच तरुणाईमध्ये त्यांचे विशेष आकर्षण आहे. त्यानंतर त्यांनी राजकीय प्रवेश करताना आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढविताना ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या प्रचारसभांना प्रचंड गर्दी होत असते. त्याचमुळे कोल्हेंना सभांसाठी उपस्थित राहण्यासाठी आणि बोलण्यासाठी आग्रह केला जातो.