दौैंड : जिंती रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेचे सिग्नल तोडून प्रवासी रेल्वेगाडीवर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न दौंड पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून, चार आरोपी फरार झाल्याची माहिती रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी दिली.वैशाली लाल्या काळे (वय ४०, रा. पोमलवाडी, ता. करमाळा) या महिलेला अटक केली आहे. तर झेलम काळे, पांड्या भोसले, शामुल काळे, गोरख भोसले (सर्व रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी फरार झालेल्या इतर आरोपींची नावे आहेत.
जिंती रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळेला सिग्नलची वायर तोडून रेल्वे थांबवायची आणि त्यातून प्रवासी रेल्वे डब्यात शस्त्र दरोडा टाकायचा, असा आरोपींचा प्रयत्न होता. परंतु, पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलीस उपनिरीक्षक नीरा कवटीकवार, दीपक बाळेकुद्रे, चंद्रकांत गायकवाड, अनिल टेके, धनंजय वीर, आनंद वाघमारे, संजय पाचपुते, मनोज साळवे, मधुकर अहिरे, सुनील गोयेकर, महिला पोलीस खरात, वनिता गोयेकर, नूतन मारटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सापळा रचून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. त्यांच्याकडून एकूण ३४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सॅक बॅग, लोखंडी जांबिया, दोन लोखंडी कट्टर, लोखंडी सुरी, कुºहाड, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी अडकित्ते, तीन बॅटऱ्या, १७ मोबाईल हॅण्डसेट असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.