पौड : लवासा येथे गुरुवारी (दि. ११) झालेल्या खून प्रकरणी पौड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. परमेश्वर नरसिंग कसबे (रा. करटखेल, ता. उदगीर, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पौड पोलिसांच्या पथकाने लातूर येथे जाऊन शिताफीने आरोपीला अटक केली. ११ फेब्रुवारीस टॅँकरचालक राजू सीताराम होळकर (मूळ रा. हवलगा, ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याचा खून झाला होता. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : आरोपी कसबेला त्याची पत्नी शीला हिचे खून झालेल्या राजू होळकर याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून तो तिला सतत मारहाण करीत होता. तसेच पत्नी व राजू होळकरला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यामुळे शीला घाबरून आपले घर सोडून गेली होती व लवासातच ओळखीच्या बाईकडे राहत होती. शोध घेऊनही शीला परमेश्वरला सापडत नव्हती. राजू होळकरनेच तिला लपवून ठेवले आहे, असा गैरसमज परमेश्वरचा झाला होता. त्यामुळे हा राग मनात धरून आरोपी व त्याच्या मित्राने राजू होळकरचा पड्याळघर गावाच्या हद्दीत लवासा ते आडमाळ रस्त्यालगत डोक्यात दगड घालून खून केला होता. राजू होळकर याचा खून केल्यावर आरोपी परमेश्वर कसबे व त्याचा मित्र लवासातून फरार झाले. आरोपी लातूर येथे असल्याचे पौड पोलिसांना समजले. शोध घेण्यासाठी पोलीस लातूरला जाऊनही आरोपींसंबंधी माहिती मिळाली नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे यांच्या सूचनेनुसार पौडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय पवार, पोलीस हवालदार अब्दुल शेख, पोलीस नाईक सागर बनसोडे, संपत मुळे, नितीन कदम, विनोद चोबे यांचे पथक लातूर येथे गेले. पोलिसांनी शोध घेऊन आरोपी परमेश्वर कसबेला उदगीर येथून १८ फेब्रुवारी रोजी अटक केली. (वार्ताहर)
लवासा खून प्रकरणातील एका आरोपीला अटक
By admin | Published: February 21, 2016 3:05 AM