पुणे : खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना पकडलेल्या सहायक पोलिस निरीक्षकासह तिघांना न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे, पोलिस शिपाई सागर तुकाराम शेळके, खासगी व्यक्ती सुदेश शिवाजी नवले (वय ४३, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला हातउसने व बँकेमधून कर्ज काढून पैसे दिले होते. बँकेच्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे उसने घेतलेल्या पैशांची मागणी केली. त्याने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्याची चौकशी सहायक पोलिस निरीक्षक अमोल कोरडे याच्याकडे होती. त्या तिघांनी तक्रारदाराकडे खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निगडी प्राधिकरणात तक्रारदाराच्या घरी सापळा रचला. नवले याला पैसे घेताना पकडले. त्यानंतर अन्य दोघांना अटक करुन विशेष न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.