पुणे : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा नवमतदारांची मोठ्या संख्येने नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात यंदा २ लाख ७९ हजार ४७९ इतक्या नवमतदारांची नोंदणी झाली आहे. तर, गेल्या दहा दिवसांत १ लाख ५४ हजार ३५४ अर्ज भरून घेण्यात आले असून, त्यापैकी १ लाख ४४ हजार ३२० अर्ज ग्राह्य धरण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली.
विभागीय आयुक्त तथा पुणे विभागाचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी उपायुक्त रामचंद्र शिंदे, वर्षा लड्डा-उंटवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे विविध ठिकाणी मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतर्गत ही नोंदणी करून पुणे जिल्ह्याने चांगले कार्य केले आहे, असे प्रतिपादन राव यांनी यावेळी केले.
राव म्हणाले, “मतदार यादीत अजूनही ११० ते ११९ वयोगटातील मतदार असून, या मतदारांची नोंदणी अधिकाऱ्यांनी वैयक्तिक पडताळणीनंतर करावी. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय सहायकांची नियुक्ती राजकीय पक्षांद्वारे करण्यात आली नाही, त्या नियुक्त्या करून घ्याव्यात. जिल्ह्यात ५४२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. एकही मतदान केंद्र केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशिवाय राहता कामा नये. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना रुजू करून घेण्यासाठी कार्यवाही करावी. रुजू न होणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे.”
मतदार यादीतील नावे वगळताना तसेच अर्ज नाकारताना खातरजमा करावी. जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज नाकारण्यात आले आहेत. अर्ज नाकारण्यापूर्वी त्यात शक्य असल्यास दुरुस्त्या करून घ्याव्यात. ज्या ठिकाणी अर्ज नाकारण्याची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण काम अत्यंत दक्षतेने आणि गांभीर्याने करावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.