नारायणगाव (पुणे) : शिरोली खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून संस्कृती संजय कोळेकर असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेने जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिरोली खुर्द येथील शेतकरी संपत केरू मोरे यांच्या शेतामध्ये मेंढपाळ संजय कोळेकर यांनी मेंढरांचा वाडा लावला होता. गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान मेंढपाळ झोपेत असताना बिबट्याने हल्ला करून या चिमुरड्या मुलीला शेतात ओढून नेले. ही बाब लक्षात येताच मेंढपाळाने आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना याबाबत कळवले. वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक व रेस्क्यू टीमने शोध घेतला असता सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास या मुलीच्या मृतदेहाचे काही अवशेष सुभाष थोरात व विश्वास जाधव यांच्या उसाच्या शेताच्या बांधावर आढळून आले.
घटनास्थळी श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी भेट देऊन संजय मोहन कोळेकर यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. नरभक्षक बिबट्या त्वरित पकडण्याची मागणी केली.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी काकडे, वन व पोलिस विभागातील कर्मचारी, रेस्क्यू टीम, पत्रकार बंधू, शिरोली खुर्दचे सुभाष मोरे, अरूण मोरे, विक्रम मोरे, संतोष सोमोशी, विश्वास जाधव, प्रशांत थोरात, रोहिदास थोरात, नामदेव ढोमसे, केरूभाऊ ढोमसे, संपत मोरे, कैलास मोरे, संदीप ढोमसे, राजाराम ढोमसे, प्रदीप थोरवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
....तर मोठा संघर्ष उभा केला जाईल : बेनके
आमदार अतुल बेनके यांनी घटनास्थळी भेट देऊन वनविभागाला लवकरात लवकर हा नरभक्षक बिबट्या जेरबंद होण्यासाठी ड्रोन, पेट्रोलिंग, पिंजरे तत्काळ लावण्याच्या सूचना केल्या. स्थळ पंचनामा करून कोळेकर परिवाराला आर्थिक मदत लवकरात लवकर कशी मिळेल याकडे प्राधान्य द्यावे. जुन्नर तालुक्यातील बिबट्या प्रवण क्षेत्रात दिवसा लाईट उपलब्ध करून द्यावी. तसेच बिबट्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यासंबंधित शासन दरबारी प्रस्ताव कुठपर्यंत आहे त्याची माहिती झाली पाहिजे. ह्या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त झाला नाही तर भविष्यात शेतकरी बांधवांसोबत शासन व वनविभागाविरोधात मोठा संघर्ष उभा केला जाईल, असा इशारा आमदार बेनके यांनी दिला.