लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “केंद्र सरकारच्या ‘फेम २’ या शहरी सार्वजनिक वाहतूकीस अर्थसाह्य करणाऱ्या योजनेतून पुण्याला दीडशे इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. महापालिका तीनशे बस घेत आहे. राज्य सरकारकडून मात्र काहीच मिळायला तयार नाही,” अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली.
‘पीएमपीएल’च्या मुख्यालयात खासदार बापट यांनी दीडशे इलेक्ट्रीक बस खरेदीची माहिती बुधवारी (दि. ३०) दिली. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, ‘पीएमपीएल’चे संचालक शंकर पवार, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यावेळी उपस्थित होते.
‘केंद्र सरकारने पुणेकरांना दिलेला दिलासा’ असे वर्णन करून बापट म्हणाले, “राज्य सरकार कसलीच मदत करत नाही, पण आम्ही त्यांच्याकडेही मदतीची मागणी करणार आहोत. केंद्र सरकार देशातील काही शहरांंना ही मदत देत आहे. एका बसची किंमत दीड लाख आहे. त्यातील ५५ लाख रुपये अनुदान केंद्र सरकार देणार आहे. केंद्राच्या अनुदानातून एकूण दीडशे बस खरेदी होतील. खासगी कंपनीकडून ही खरेदी होईल. बसचा चालक, दुरूस्ती खर्च कंपनीकडे असेल. त्या बदल्यात त्यांना ६३ रुपये ९५ पैसे प्रतिकिलोमीटर भाडे देण्यात येईल. विद्यूत खर्च पीएमपीएल करेल.”
जगताप यांनी बसची तांत्रिक माहिती दिली. या बस बीआरटी मार्गावर चालवण्यात येतील. ३७ आसनक्षमतेच्या या बस संपूर्ण वातानुकूलीत असतील. त्यापासून प्रदुषण होणार नाही. महापौर मोहोळ म्हणाले की, बस खरेदीची मुदत संपली होती. ती वाढवून घेण्यात आली. येत्या एप्रिपासून बस यायला सुरूवात होईल.
चौकट
“पेठांमधील मध्यवर्ती भागात गोलाकार फिरणाऱ्या ३०० बसची खरेदी केलीज जाईल. त्याचे दिवसभराचे तिकीट १० रूपये असेल. कोरोना आपत्तीमुळे ही प्रक्रिया लांबली. मात्र आता ती पूर्ण झाली असून त्याही बस ‘पीएमपीएल’च्या ताफ्यात हळूहळू दाखल होतील.”
-हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष.