लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कृषी विभागाच्या वतीने राज्यात सर्व तालुक्यांमध्ये संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार सुरू करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल या बाजारांमधून थेट ग्राहकांना मध्यस्थांची दलाली टाळून विक्री करता येईल. यातून शेतकरी व ग्राहक या दोघांचाही फायदा होणार आहे.
राज्यात असे १२ हजार ६१६ रयत बाजार सुरू झाले आहेत. प्रत्येक तालुक्यात १०० याप्रमाणे संपूर्ण राज्यात ३५ हजार १०० बाजार सुरू करण्यात येणार आहेत. कृषी खात्याच्या आत्मा या विभागाच्या माध्यमातून हे काम होत आहे. तालुक्यातील सार्वजनिक जागा पाहून तिथे हे बाजार सुरू केले जात आहेत. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, प्रशासन यांची परवानगी काढणे, शेतकरी गट तयार तयार करून त्यांना या बाजाराशी जोडून देणे हे समन्वयाचे काम आत्मा करत आहे.
राज्यातील ९१३६ शेतकरी गट व ६०५ शेतकरी उत्पादक कंपन्या यांना आतापर्यंत या रयत बाजाराच्या माध्यमातून थेट ग्राहकांबरोबर जोडून देण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १८ हजार ७५० जागा आत्माने यासाठी प्रस्तावित केल्या आहेत. त्यातील १२ हजार ६१६ जागांवर हे बाजार प्रत्यक्ष सुरू झाले आहेत. शेतातील भाजीपाल्यासह कोणताही माल शेतकरी थेट जागेवर आणून विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी त्याला कोणतेही भाडे वगैरे द्यावे लागत नाही. शेतकरी गट असेल तर ते त्यांच्यात उपलब्ध मालाचे नियोजन करून या जागेवर विक्री करू शकतात. जागेची स्वच्छता वगैरे जबाबदारी त्यांना सांभाळावी लागते. एरवी माल व्यापाऱ्यांजवळ पडत्या भावाने देऊन शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी ही शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना कृषी विभाग राज्यात राबवत आहे.
कोट --------------
शहरांमध्ये महापालिका, तसेच खासगी व्यक्तींबरोबर चर्चा करून अधिक मोठ्या व सुसज्ज जागा भाडेतत्वावर मिळवण्यात येत आहेत. पुण्यात स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत लवकरच असे ३५ बाजार सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यातही शेतकरी गट जोडून घेण्यात येतील. यामध्ये मात्र त्यांना जागेची दुरुस्ती-देखभाल पाहावी लागेल व भाडेही द्यावे लागेल. मात्र, शहरातील ग्राहक असल्याने त्यांना दरही चांगले व तरीही व्यापारी घेतात त्यापेक्षा जास्तच मिळतील.
किसनराव मुळे, संचालक, आत्मा