पिंपरी : कोरोनाचा (कोविड १९) प्रसार रोखण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचारी, आचारी यांची संख्या त्या प्रमाणात कमी होणार आहे. पुणे जिल्हयातील तब्बल दीड लाख हॉटेल कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे.
सोमवारपासून (दि. ५) पन्नास टक्के क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ही मर्यादा घातली आहे. त्याच बरोबर रात्री दहाच्या ठोक्याला हॉटेल बंद होतील. पूर्वी ही वेळ मध्यरात्री साडेबारा होती. हॉटेलची वेळ कमी झाल्याने, तसेच निम्म्या क्षमतेने हॉटेल सुरू राहणार असल्याने तितक्या प्रमाणातच कर्मचाऱ्यांना बोलावले जाणार आहे. परिणामी आपोआपच कर्मचारी संख्या देखील निम्मी होईल.
या बाबत माहिती देताना पुणे जिल्हा हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, हॉटेल सुरू करण्याचा आदेश रविवारी उशिरा आला. गेल्या सहा महिन्यांच्या काळात कर्मचारी आणि अनेक आचारी देखील बाहेर गावी गेले होते. त्यामुळे अडीच लाख कर्मचाऱ्यांपैकी पंचवीस हजार कर्मचारी उपस्थित आहेत. महिना अखेरीस पर्यंत ही संख्या लाखावर जाईल. मात्र पन्नास टक्के क्षमतेने हॉटेल सुरू राहणार असल्याने त्या प्रमाणातच कर्मचारी उपस्थित असतील.
पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे सचिव गणेश कुदळे म्हणाले, सध्या हॉटेल कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहेत. संख्या हळू हळू वाढत असली तरी पन्नास टक्के क्षमता बंधनामुळे मर्यादित मनुष्यबळ ठेवावे लागेल. तसेच अनेक व्यावसायिक ग्राहकांचा अंदाज घेऊन पुढील आठवडाभरात हॉटेल सुरू करतील.
------
जिल्ह्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट
मोठी रेस्टॉरंट-हॉटेल - ८५००
लहान रेस्टॉरंट-हॉटेल - ४५००
पुणे शहरातील बार-रेस्टॉरंट - १७००
पिंपरी चिंचवड मधील बार-रेस्टॉरंट - २५०
पिंपरी-चिंचवड मधील रेस्टॉरंट - ९५०
ग्रामीण भागातील बार-रेस्टॉरंट - ६०० ते ७००
जिल्ह्यातील हॉटेल कामगार संख्या - २.५० लाख
पन्नास टक्क्यामुळे बाधित कामगार संख्या - १.५० लाख