पुणे : कोरोनाकाळात अनेक विद्यार्थी, तसेच शिक्षकांना तणावाचा सामना करावा लागला, त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या मदतीने विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये दीड लाख विद्यार्थी, तसेच ४०० हून अधिक प्राचार्यांना मनःशांतीचे धडे दिले. ‘एज्यु वेलनेस’ या कार्यक्रमाने या उपक्रमाची १० जुलै रोजी सांगता झाली. या कार्यक्रमास ४३ विद्यापीठांचे कुलगुरू ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती व राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून तर ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री रविशंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते.
भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, कोरोनाच्या कठीणकाळात योग, प्राणायाम आणि ध्यान-धारणा या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्यात. तसेच जगालाही याचे महत्त्व पटवून द्यायला हवे.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, कोरोना हा फुफ्फुसांशी संबंधित आजार असून प्राणायामने फुफ्फुसे निरोगी राहण्यास मदत होते. विद्यापीठाशी संलग्न घटकांवर असणारा तणाव कमी करणे ही सामाजिक जबाबदारी आहे.या उपक्रमाचा अनेक विद्यार्थी व प्राचार्यांवर सकारात्मक परिणाम झाला.
श्री श्री रविशंकर म्हणाले की, तणाव कमी करण्यासाठी योग, प्राणायाम, सुदर्शनक्रिया यांसारखे तंत्र वापरत आपण एक निरोगी समाज घडवून भारताचं नाव जगासमोर आणत आहोत. तणावमुक्तीतून समाजात आपुलकी वाढेल.
----