पुणे : आंदोलन म्हटले, की लोकांना वेठीस धरून मागण्या मान्य करून घेणे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुणे विभागाने एक वेगळा आदर्श घालून दिला. आंदोलनात सहभाग घेतला; मात्र टंचाईचे भान ठेवून पाणी योजना बंद ठेवल्या नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे दिड लाख लोकसंख्या व चाकणमधील २५0 कंपन्यांना त्या दिवशी पाणी मिळाले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर या प्रादेशिक विभागांतर्गत जवळपास २५ नळ योजना चालविल्या जातात. शिवाय, ५७ प्रादेशिक योजनांच्या देखभाल-दुरुस्तीचीही जबाबदारी या विभागाकडे आहे. अभियंत्यांपासून शिपाई ते कामगार असे जवळपास ६ हजार ५०० अधिकारी- कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. सोमवारपासूनच त्यांनी पंपिंग बंद केले होते; मात्र पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबरपासून सामूहिक रजा आंदोलनात सहभाग घेतला. त्याअगोदर काळ्या फिती लावून निषेध केला. मात्र, पाणीपुरवठा केंद्र चालू ठेवले. त्यामुळे या विभागातील गावांवर या कालावधीत पाणी-पाणी करण्याची वेळ आली नाही. जीवन प्राधिकरणातर्फे बारामतीतील, जळोची, देहू, औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेले चाकण, डोंगरगाव तसेच पुणे शहरालगतचे वेगाने शहरीकरण वाढत असलेल कोंडवे-धावडे येथील पाणी योजना चालविल्या जातात. या योजनांवर येथील सुमारे दिड लाख लोकसंख्या व चाकणमधील २५0 कंपन्या अवलंबून आहेत. पाणी बुद केले असते तर एवढी मोठ्या लोकसंख्येला पाणी मिळाले नसते. (प्रतिनिधी)
दीड लाख लोकांना पाणी मिळाले नसते
By admin | Published: December 10, 2015 1:32 AM