पुणे : राज्यात प्रगत जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तब्बल १ हजार ६६० बालके कुपोषित आणि तिव्र कुपोषित आढळले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागातर्फे बालकांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत २ लाख १२ हजार ३१८ बालकांची तपासणी केली असून त्यात १ हजार २८९ बालके मध्यम कुपोषित, तर ३७१ बालके अतितीव्र कुपोषित सापडली आहेत.
जिल्ह्यात कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधामुळे आणि लॉकडाऊनमुळे तसेच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बालकांच्या तसेच महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे कुपाेषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सुचनेनुसार महिला व बालविकास विभागाने ग्रामीण भागातील गर्भवती, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, तसेच सॅम-मॅम श्रेणीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख १२ हजार ३१८ बालकांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यातून मॅम श्रेणीतील म्हणजेच मध्यम कुपोषित १ हजार २८९ बालके आढळली आहेत, तर अतितीव्र कुपोषित श्रेणीतील ३७१ बालके आढळली आहेत. उर्वरित बालके निरोगी आहेत.
या तपासणी पथकात समुदाय आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेवक यांचा समावेश आहे. हे पथक घरोघरी जाऊन बालकांची तपासणी करत आहेत. आरोग्य विभाग आणि प्रमाणित उपकरणांच्या साहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य तपासणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे; तसेच कुपोषण आणि मातांचे समुपदेशन केले जात आहे.
अशी होतेय तपासणी...
अंगणवाडी सेविकांतर्फे बालकाचे वजन घेतल्यानंतर चार प्रकारांत त्याचे वर्गीकरण केले जात असते. सॅम बालकाचे वजन घेतल्यानंतर त्यांची उंची व दंडाचा घेर मोजला जातो. त्यानुसार या बालकांची श्रेणी निश्चित केली जाते. अतितीव्र कमी वजन असलेल्या बालकाला सॅम, तर मॅम बालक तीव्र स्वरूपात कमी वजन असलेला असतो. सॅम बालकाला एक महिन्यापर्यंत अंगणवाडीत किंवा आरोग्य केंद्रात आहार पुरविण्यात येतो. त्या बालकांचे वजन आणि उंची वाढीच्या दृष्टीने आहाराचे नियोजन करण्यात येते.
''आरोग्य सर्वेक्षणात आढळलेली कुपोषित बालकांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी अजुन सुरू आहे. ही मोहिम पूर्ण झाल्यावर या बालकांचे गट पाडण्यात येणार आहे. त्या नुसार त्यांना आवश्यक पोषण आहार देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या द्वारे त्यांना सर्वसामान्य गटात आणण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.'' तालुकानिहाय आकडेवारी
तालुका - मॅम - सॅम
आंबेगाव - १३४ - २०बारामती - १३४ - २१भोर - ५२ - १३दौंड - ६२ - १७हवेली - ११३ - २०इंदापूर - ७९ - २५जुन्नर - १३७ - २३खेड - १२९ - १४३मावळ - १५३ - ४१मुळशी - ४०- ०५पुरंदर - ४५ - ०७शिरूर - १५१ - २६वेल्हा - २७ - १०------------------
एकूण - १२८९ - ३७१