पुणे : मराठी भाषेमध्ये कसदार लिहिती-वाचती पिढी घडावी यासाठी भाषा फाउंडेशनतर्फे गेल्या सहा वर्षांपासून घेण्यात येणारी मराठी ‘भाषा’ऑलिंपियाड ही अभिनव स्पर्धा रविवारी (दि.७) ऑनलाइन माध्यमातून पार पडली. कोरोना काळात देखील स्पर्धेत खंड न पाडता संस्थेने ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली. यंदा या स्पर्धेमध्ये दीड हजार मुलांनी सहभाग घेतला.
भाषा संस्थेतर्फे २०१५ साली शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा आॅलम्पियाड ही अभिनव स्पर्धा घेण्यास सुरूवात झाली. भाषा फाउंडेशनच्या अध्यक्ष स्वाती राजे म्हणाल्या, यंदा स्पर्धेतून तिसरीच्या मुलांना वगळले होते. ही स्पर्धा चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली.
यंदा शाळा बंद असल्याने परीक्षा शाळेच्या प्रांगणात होऊ शकणार नव्हत्या. मग ही परीक्षा ऑनलाइन घेण्याचं ठरवलं. भाषेची परीक्षा ऑनलाइन घेणं ही सोपी गोष्ट नव्हती. मुलांना यंदा ऑनलाइन माध्यम परिचित असलं तरी बऱ्याच पालकांच्या तांत्रिक माहितीच्या मर्यादा, त्यांच्याकडे मेल आय डी नसणं, मेल आय डी म्हणजे कसा काढायचा ते माहीत नसणं, तो वापरायचा कसा त्याची कल्पना नसणं, गुगल फॉर्म म्हणजे काय, तो ‘सबमिट’ करणं म्हणजे काय अशा अनेकानेक प्रश्नांची उकल करत आम्ही प्रत्येक इच्छुक आणि उत्सुक विद्यार्थ्याला या गंमत परीक्षेच्या दारापर्यंत पोचवू शकलो.
यंदाच्या अपवादात्मक परिस्थितीतही खंड न पडता हा मराठी भाषेविषयीच्या जिव्हाळ्याचा प्रवाह पुढच्या पिढीच्या प्रांगणापर्यंत आम्ही नेऊ शकलो, याचा आनंद मोठा आहे !
...