पिंपरी : बंद खोलीत आईच्या मृतदेहाजवळ दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलाला दोन दिवस उपाशी रहावे लागले. भुकेने व्याकूळ झालेल्या या बाळाला महिलापोलिसांनी मायेचा घास भरवला. दिघीतील मॅगझीन चौकाकडून भोसरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुगेवस्ती येथे सोमवारी (दि. २६) हा प्रकार उघडकीस आला.
सरस्वती राजेश कुमार (वय २९, रा. कानपूर, उत्तर प्रदेश ), असे मृत महिलेचे नाव आहे.
दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला आणि तिचा पती हे त्यांच्या दीड वर्षांच्या मुलासह दोन महिन्यांपूर्वी फुगेवस्ती येथे राहण्यास आले होते. भाडेतत्वारील खोलीत ते राहात होते. तिचा पती राजेश कुमार हा त्याच्या मुळगावी उत्तर प्रदेश येथे गेला होता. त्यानंतर सलग दोन दिवस त्यांची खोली बंद असून, दुर्गंधी येत असल्याची माहिती घरमालकाने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भीमसेन शिखरे घटनस्थळी दाखल झाले. खोलीचा बंद दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सरस्वती यांचा मृतदेह खोलीत दिसून आला. तसेच त्यांचा दीड वर्षांचा मुलगा त्यांच्या मृतदेहाजवळ निपचित पडला होता. आईच्या मृतदेहाजवळ दोन दिवस उपाशी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महिला पोलीस सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांनी तेथे येऊन त्या मुलाला जवळ घेतले. त्याला पाणी पाजून दूध व बिस्किट खाऊ घातले. त्यानंतर त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तसेच कोरोना चाचणी केली. कोरोना तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर त्याला दिघी येथील शिशूगृहात दाखल करण्यात आले.
हृदयस्पर्शी.. आईच्या मृतदेहाजवळ २ दिवस उपाशी राहिले दीड वर्षांचे बाळ; खाकी वर्दीने भरविला मायेचा घास pic.twitter.com/es1PUaSTZl
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2021
दरम्यान, सरस्वती यांच्या तोंडातून फेस आला होता. वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. मयत सरस्वती यांच्या पतीला फोन करून या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. सरस्वती यांचा मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पती राजेश कुमार आल्यानंतर त्यांच्या ताब्यात मृतदेह देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.