लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एखादं मूल लठ्ठ असल्यास ‘तो खात्यापित्या घरचा आहे’ किंवा ‘किती छान गुटगुटीत आहे ती,’ असे म्हणत मुलांच्या स्थूलपणाचे समर्थन केले जाते. पण इथेच चूक होते. मुलांचे वजन हे त्यांच्या वय आणि उंचीनुसारच असले पाहिजे, असे डॉक्टरांकडून वारंवार सांगितले जात असले तरी पालकांकडून त्याकडे दुर्लक्ष होते.
गेली दीड वर्ष मुलांच्या शाळा आणि मैदानी खेळ बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी एकाच ठिकाणी दोन ते तीन तास बसल्याने किशोरवयीन मुलांच्या वजनात जवळपास वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोविड-१९ ची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगितले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर मुलांमधील वाढता लठ्ठपणाही कोरोनाला आमंत्रण देणारा ठरू शकतो, यासाठी पालकांनी वेळीच सावध व्हावे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोना काळात मुलांच्या जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, संगणक, लॅपटॉप, मोबाईल आणि इंटरनेटचा अतिवापर याबरोबरच टीव्ही किंवा ऑनलाइन गेम खेळतच जेवण करण्याच्या विचित्र सवयींमुळे मुलांमध्ये स्थूलता वाढू लागली आहे. मध्यम आणि उच्च मध्यम वर्गामधील ९ ते १९ वयोगटातील मुलांच्या वजनवाढीचे प्रमाण अधिक आहे. मुले घरात बसून कंटाळतील म्हणून मुलांना केक, पिझ्झा, बर्गरसारखी जंक फूड पालकांकडूनच दिली जात आहेत. त्यामुळे मुलांचा सकस आहार कमी झाला आहे. शाळेत मुलांच्या किमान शारीरिक हालचाली व्हायच्या; पण आता त्या कमी झाल्या आहेत. पालक सोसायटीमध्येही खाली मुलांना जाऊ देत नाहीत. या सर्वांमुळे मुलांमधील लठ्ठपणा वाढीस लागला आहे. त्याचबरोबर मुले घराबाहेर पडत नसल्याने ती वारंवार आजारी पडण्याचे प्रमाणसुद्धा कमी झाले असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
चौकट
लठ्ठपणा धोक्याचा
“लठ्ठपणा हा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीचा घटक आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लठ्ठ मुलांना कोरोनाचा धोका असू शकतो. त्यामुळे मुलांच्या लठ्ठपणाला पालकांनी वेळीच आवर घातला पाहिजे. शासनाच्या लहान मुलांच्या कोविड टास्क फोर्सतर्फे पालक, अंगणवाडी सेविका, डॉक्टर यांच्यासाठी प्रशिक्षण पुस्तिका तयार केली जात आहेत. कोविडची संभाव्य लाट आली तर काय करायचे, यासाठी राज्यातील बालरोगतज्ज्ञांचे प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले आहे. आपलं मूल लठ्ठ आहे का? हे पालकांनी तपासून घ्यावे.”
- डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ज्ञ आणि सदस्य, पिडियाट्रिक कोविड टास्क फोर्स, राज्य सरकार
चौकट
वजन कमी करण्यासाठी काय करावे?
* मुलांना दररोज नियमितपणे सूर्यनमस्कार घालण्यास सांगावे.
* घरात किंवा सोसायटीमध्ये जिने वर-खाली करण्यास सांगावे.
* सकाळी आणि संध्याकाळी मुलांना घाम येईपर्यंत व्यायाम करायला लावावा.
* आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, ताजी फळे, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी यांचा समावेश असावा.
* मुलांना फास्टफूड, जंक फूड, चिप्स, स्नॅक्स, चॉकलेट, बिस्किटे, मिठाई, वडापाव आदींपासून दूर ठेवावे.
चौकट
‘कोचावरचे लठ्ठ बटाटे’
एकाच ठिकाणी ऑनलाइन क्लास आणि टीव्ही बघत बसण्याच्या वाईट सवयीमुळे मुलांचे वजन वाढू लागले आहे. थोडे जरी चालले तरी त्यांना दम लागायला सुरुवात झाली. ते पाहिल्यानंतर तत्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार सकस आहारावर लक्ष देऊ लागल्यामुळे आता त्याचं वजन आटोक्यात येऊ लागले आहे. पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
- मधुरिमा फडके, पालक
----------------------------------