पुणे : फुरसुंगी येथील जमिनीतील इनामी शेरा रद्द करण्यासाठीचे पत्र मिळवून देण्यासाठी तहसिलदाराच्या नावाने ६ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकाला अटक केली आहे.
राजेंद्र बाळासाहेब मोरे (रा. फुरसुंगी, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार गुंजाळ याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार यांच्या फुरसुंगी गावातील जमिनीवरील इनामी शेरा रद्द करण्याचे प्रकरण हवेली तहसील कार्यालयात होते. हे प्रकरण तहसीलदारांनी पूर्ण केले होते. राजेंद्र मोरे यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून इनामी शेरा रद्द करण्यासाठीचे पत्र मिळवून देण्यासाठी ६ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. इनामी शेरा रद्द करण्यासाठीचे नोंद घेण्याबाबतचे पत्र मिळवून दिले. त्याची तक्रार आल्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १७, १८ व १९ ऑगस्ट रोजी पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. मात्र, लाच देण्यात आली नाही. परंतु, मागणी केली असल्याने शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खडक पोलीस ठाण्यात लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करुन राजेंद्र मारे यांना अटक केली आहे. गुंजाळ याचा शोध घेण्यात येत असून पोलीस निरीक्षक सुनिल बिले अधिक तपास करीत आहेत.