पुणे : ज्वेलर्सचे दुकान बंद करताना दागिन्यांचा स्टॉक कमी दाखवून २ कोटी ३० लाख रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने चोरल्याप्रकरणी आणखी एकास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
छगनलाल ऊर्फ भालचंद्र भगवानचंद जैन (वय ५२, रा. मार्केटयार्ड, मुळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वी महेंद्रसिंग मफतसिंग वाघेला (वय २६, रा. हडपसर), तृप्ती हुकमीचंद खंडेलवाल (वय ३५, रा. सदाशिव पेठ) आणि उत्तम अरुण घोष (वय ३९, रा. सदाशिव पेठ, मुळ रा. पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आली आहे.
हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. लक्ष्मी रस्त्यावरील राठोड ज्वेलर्समध्ये दोन ऑक्टोबरला चोरी झाली. याबाबत संजय पुखराज राठोड (वय ५२, मुकुंदनगर) यांनी फिर्याद दिली. वाघेला आणि खंडेलवाल यांनी ज्वेलर्सचे दुकान बंद करताना दागिन्यांच्या स्टॉक देताना वेळोवेळी एक-एक दागिने स्टॉकमधून कमी दाखवून २ कोटी ३० लाख ६५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून दोघांनी ही दागिने वितळविण्यासाठी घोष याच्याकडे दिले होते.