पुणे : हॉटेल व्यावसायिकाकडे पाच हजार रूपयांची खंडणी मागून हॉटेलच्या गल्ल्यातील 1 हजार 300 रुपये जबरदस्तीने काढून नेल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
गणेश आडागळे (वय 23) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आणखी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 33 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. 25 मार्च रोजी रात्री 10 च्या सुमारास दापोडी परिसरात ही घटना घडली.
फिर्यादी हे त्यांच्या हॉटेलवर थांबले होते. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. फिर्यादींना धमकावून शिवीगाळ करत दरमहा 5 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. लाकडी दांडक्याने मारण्याची धमकी देत हॉटेलच्या गल्यातील 1 हजार 300 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच दहशत पसरविण्याच्या हेतून आरडा ओरडा करत दांडक्याने हॉटेलच्या दरवाजावर, काऊंटरवर मारून नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी आडागळे याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी, अशा प्रकारे त्यांनी आणखी कोणाकडे खंडणी मागितली आहे का?, त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.