शिरगाव : किरकोळ भांडणाचा राग मनात धरून सांगवडे येथे रविवारी सरपंच दीपाली लिमन यांचे पती नवनाथ लिमन यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी सोमवारी एकास अटक करण्यात आली आहे. सांगवडे येथे रविवारी मध्यरात्री मंदिरात कीर्तन सुरू असताना चार ते पाच जणांनी भाजपा कार्यकर्ते नवनाथ लिमन यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्या डोक्यावर, पोटावर, हातावर, तलवार, कोयता व लाकडी दांडक्याने वार केले़ यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या प्रकरणाचा तपास तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील हे करत असून, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, नाईक जयराज पाटणकर इतर आरोपींच्या शोधावर आहेत. एका आरोपीस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी त्याला कोर्टासमोर हजार केले जाणार आहे. बाकी चार आरोपींचाही शोध सुरू आहे. लवकरच त्यानाही आम्ही ताब्यात घेऊ असे पाटील यांनी सांगितले. या खून प्रकरणामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने तळेगाव पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. (वार्ताहर)
लिमन खूनप्रकरणी एकास अटक
By admin | Published: April 25, 2017 4:11 AM