तळेगाव दाभाडे : परंदवडी येथे सोमवारी झालेल्या परप्रांतीय कामगाराच्या खूनप्रकरणी तळेगाव पोलिसांनी वेगाने सुत्रे हलवून रूम पार्टनरला अटक केली आहे. वडगाव न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राजू रामकिसन दुसाद (वय २५, रा. भंडालपूर चायबागान, जि. हायलाखांदी, आसाम) असे पोलीस कोठडी मिळाल्याचे नाव आहे. नंदलाल जगत कोईरी (वय ४३, रा. आसाम) या कामगाराचा अज्ञात व्यक्तीने सोमवारी डोक्यात दगड घालून खून केला होता. कोईरी यांचा मृतदेह परंदवडी येथील राजहंस शाळेच्या पाठीमागे आढळला. या संदर्भात विठ्ठल भोते यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली. परिसरात घबराटीचे वातावरण होते. आरोपीचा शोध घेणे तळेगाव पोलिसांपुढे एक आव्हान बनले होते. देहूरोड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत बाबर, सहायक पोलीस निरीक्षक वायसिंग पाटील, ए. एम. लांडगे यांनी वेगाने तपासाची सूत्रे हलविली. अखेरीस त्यांना खुनातील आरोपीपर्यंत पोचण्यास यश आले. दोघेही मित्र असलेले नंदलाल कोईरी व राजू दुसाद हे परंदवडी येथे भाडे तत्त्वावर घेतलेल्या एका खोलीत राहत होते. राजू दुसाद याला दारूचे व्यसन आहे. रेशनिंग, रूमचे भाडे व दारू पिण्यासाठी लागणारे पैसे देण्यास नंदलाल कोईरी नकार देऊ लागला. याचा राग मनात धरून आरोपी राजू दुसाद याने डोक्यात दगड घालून कोईरी याचा निर्घृण खून केला. (वार्ताहर)
कामगार खूनप्रकरणी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2016 3:22 AM