पुणे : चाकूने वार करून रिक्षा प्रवाशाला लुटल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
अल्ताफ पठाण (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर, आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २९ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. २३ जूनला पुणे स्टेशन ते मालधक्का चौक परिसरात ही घटना घडली.
आरोपींनी फिर्यादींना वाघोली येथे घेऊन जाण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवले. त्यानंतर फिर्यादींना चाकूने उजव्या हातावर वार करून जखमी केले. मारहाण करत २ हजार ६०० रुपये, मोबाईल, बॅग जबरदस्तीने चोरून नेले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पठाण याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी, आरोपीचा शोध घेण्यासाठी, त्याचा कोणी साथीदार आहे का? याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.
---------------------