पुणे : मित्राबरोबरच्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून ‘तू त्याच्याबरोबर का फिरतोस? तुला मस्ती आली आहे का? थांब तुझी मस्ती उतरवतो,’ असे म्हणून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अभिजित महादेव कांबळे (वय २४, रा. घरकुल, मांजराईनगर, मांजरी बुद्रुक ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ नेटके आणि मयूर शिंदे या दोघांवरही लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. आशिष बाळासाहेब उंद्रे (वय २४, रा. इंदिरानगरवस्ती, मांजरी खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दि. ८ मे रोजी मांजरी खुर्द (ता.हवेली) आबा मुरकुटे यांच्या घराजवळ रात्री 8 च्या सुमारास घडली. फिर्यादी यांचा मित्र विकास सोनावणे आणि आरोपी सौरभ नेटके यांची पूर्वी भांडणे झाली होती. त्यावेळी फिर्यादी विकास याच्याबरोबर होते. फिर्यादी मौजे मांजरी खुर्द येथून रस्त्यावर पायी जात असताना दुचाकीवरून ट्रिपल सीट येत फिर्यादीला लोखंडी कोयत्याने पाठीवर व डोक्यात वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. फिर्यादीने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार तिघांपैकी एका आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक होणे बाकी आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले कोयते आणि दुचाकी जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
---------------------------------