सांगवी (बारामती ) :बारामती तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीने अजब फतवा काढल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उद्या 26 जानेवारीच्या ग्रामसभेला पाणीपट्टी व घरपट्टी भरलेल्या ग्रामस्थांनाच ग्रामसभेत बोलण्याचा अधिकार दिला जाईल, अशा आशयाचा बोर्ड ग्रामपंचायतीसमोर लावण्यात आल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांनी देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कर भरलेल्या पावत्या असल्याशिवाय ग्रामसभेला उपस्थित राहू देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभेत प्रत्येक नागरिकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्याला कोणीही बंधन घालू शकत नाही. ग्रामपंचायतीच्या या अजब फतव्यामुळे मात्र, काही ग्रामस्थांनी देखील कर भरलेल्या पावत्या घेऊन उद्या ग्रामसभेत बोलण्याची तयारी केली आहे. तर या निर्णयामुळे उद्याच्या ग्रामसभेवर बहिष्कार घालणार असल्याचे देखील ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामसभा हे गावाचा परिपूर्ण विकास साधण्यासाठी ग्रामस्थांच्या हातात असणारे प्रभावी साधन आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेला उपस्थित राहून कामकाज व विविध योजना समजून घेतल्या तर गावाचा विकास खूप गतीने होईल. उपेक्षित व वंचितांना सर्व शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवून देता येतो. राज्यघटनेने पंचायत राज व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. गाव पातळीवर काम करणारी व लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांमार्फत चालवली जाणारी ग्रामपंचायत ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे. मात्र सरपंच कार्यकारणीने घेतलेल्या या निर्णयाला ग्रामस्थांनी सोशल मीडियातून चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.