भोर (पुणे): बालवडी (ता.भोर) येथील ज्येष्ठ महिलेच्या अंत्यविधीनंतर अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढून फेकून मृतदेहाची विटंबना केल्याची घटना रविवारी सांयकाळी घडली. या प्रकरणी भोर पोलिसांनी नेरे (ता.भोर) येथील तरुणावर गुन्हा दाखल केला. प्रकाश सदुभाऊ बढे असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बढे यांचे हॉटेल पेटवले. अक्षय विजय किंद्रे (वय ३० रा.बालवडी)यांनी फिर्याद दिली आहे. स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बालवडी गावातील वृद्ध महिलेचे निधन झाले होते. त्यांचा अंत्यविधी नेरे गावाजवळच्या ओढ्यात करतात. मात्र, भोर-मांढरदेवी रस्त्यावर नेरे येथे पुलाचे काम सुरू असल्याने आणि रात्र असल्यामुळे बालवडी गावाच्या हद्दीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. स्मशानभूमीच्या जागेचा वाद सुरू असून, माझ्या हाॅटेलसमोर आमच्या जागेत अंत्यविधी का केला, याचा राग मनात धरून प्रकाश सदाशिव बढे रा.नेरे या व्यक्तीने अर्धवट जळलेल्या मृतदेहाची जळत असलेल्या ठिकाणावरून काढून दुसऱ्या ठिकाणी फेकून देत मृतदेहाची विटंबना केली. घटनेची माहिती मिळताच, भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब पवार, सहायक पोलिस निरीक्षक करपे, श्री चव्हाण, उद्धव गायकवाड, विकास लगस व इतर पोलिस कर्मचारी दाखल झाले.
पोलिसांनी बढे यांना ताब्यात घेतले असून, उपचारासाठी भोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. गावात तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांनी शांत राहण्याचे आवाहन केला आहे, तसेच घटनेची नोंद भोर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पुढील कारवाई भोर पोलिस करीत आहेत.