जेजुरी : जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला आलेल्या परिवारातील पाच वर्षांची संस्कृती गडकोट आवारात खेळता-खेळता गडाच्या दर्शनी भागातील खिडकीतून सुमारे तीस फूट खोल कोसळली. यात ती गंभीर जखमी झाली. संस्कृती सतीश केदार असे जखमी झालेल्या बालिकेचे नाव असून, ही घटना बुधवारी (दि. ८) सकाळी घडली. सध्या तिच्यावर जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे. संस्कृतीचे वडील सतीश केदार हे बीड येथून मेहुण्याच्या लग्नानंतर नववधू आणि नवरदेवासह परिवारासह जेजुरीत खंडोबा दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर गडकोट आवारातील बालद्वारीत लहान मुले खेळत होती. खेळता-खेळता घरातील व्यक्तींचे लक्ष चुकवून अचानक संस्कृती बालद्वारीनजीकच्या खिडकीतून गडाबाहेर तीस फूट खोल कोसळली. देवसंस्थान कर्मचाºयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी केदार परिवाराला बरोबर घेत बेशुद्धावस्थेतील बालिकेला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर तातडीने उपचार सुरू केल्याने तिचे प्राण वाचले. २४ तासांनंतर ती शुद्धीवर आली आहे. या घटनेत तिचा डावा हात मोडला आहे तर डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोन दिवसांनी संस्कृतीच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तिच्यावर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च देव संस्थानच्यावतीने करण्यात येत आहे........भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंग करणार... गडकोट आवार, बालद्वारी परिसरातील दगडी खिडक्यांना रेलिंग करून घेणार असून, पुढील आठवड्यातच या कामाला सुरुवात करणार असल्याचे देवसंस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
जेजुरी गडकोटाच्या खिडकीतून पडून चिमुकली गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 1:45 PM
जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला आलेल्या परिवारातील पाच वर्षांची संस्कृती गडकोट आवारात खेळता-खेळता गडाच्या दर्शनी भागातील खिडकीतून सुमारे तीस फूट खोल कोसळली.
ठळक मुद्देभाविकांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंग करणार उपचाराचा सर्व खर्च देव संस्थानच्यावतीने करण्यात येणार