नीलेश जंगम, पिंपरीप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) लायसन्स आणि वाहननोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना आता केवळ एका क्लिकवर लायसन्स व आरसी बुकची माहिती मिळू शकणार आहे. परिवहन मंत्रालयातर्फे याबाबतचे दोन मोबाईल अॅप विकसित केले आहेत. पुण्यातील आरटीओ कार्यालयात त्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू आहे. तेथे ही कार्यप्रणाली यशस्वी झाल्यास पिंपरी-चिंचवडच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्येही ती सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. लायसन्स, आरसी बुक न मिळाल्याच्या तक्रारी घेऊन असंख्य नागरिक आरटीओमध्ये हेलपाटे मारतात. रांगेमध्ये थांबा, या खिडकीवरून दुसऱ्या खिडकीवर जा असा, त्यांना नित्याचा अनुभव येत असतो. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी परिवहन कार्यालयाने हायटेक होत अॅप विकसित केले आहेत. या अॅपवर आपला क्रमांक टाकल्यानंतर सर्व माहिती लगेच उपलब्ध होणार आहे. लायसन्सची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लायसन्स क्रमांक मिळतो. त्यानंतर लायसन्स पोस्टाने घरी पाठविले जाते. ते ४५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा ते लवकर मिळू शकत नाही. ते का मिळाले नाही याची चौकशी करण्यासाठी आरटीओत जावे लागते. आता या अॅपवर लायसन्सचा क्रमांक टाकल्यानंतर, लायसन्स सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, त्याची डिलिव्हरी कधीपर्यंत मिळेल ते समजेल. याच पद्धतीने वाहननोंदणीच्या आरसी बुकचेही ट्रॅकिंग करता येईल.
एका क्लिकवर लायसन्स
By admin | Published: October 17, 2015 12:58 AM