पुणे : घरावर बसविलेल्या मोबाईल टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करुन पैसे न दिल्याने नगरसेवकपदाचा गैरवापर करुन महापालिकेत अर्ज करुन टॉवर पाडायला लावला. तसेच घरदेखील पाडून टाकणार अशी धमकी दिल्याने दत्तवाडीमधील संजय महादेव सुर्वे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी भाजपचे नगरसेवक आनंद रमेश रिठे (रा. साई मंदिराजवळ, दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संजय महादेव सुर्वे (वय ५३, रा. महादेव बिल्डिंग, दत्तवाडी) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शशांक संजय सुर्वे (वय २६) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२१ पासून २१ जून २०२१ पर्यंत सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सुर्वे यांनी आपल्या दत्तवाडी येथील महादेव बिल्डिंगच्या टेरेसवर मोबाईल कंपनीचा नवीन टॉवर बसविला होता. ते दत्तवाडी प्रभाग क्रमांक २९ मध्ये रहात असताना त्याबाबत दत्तवाडी प्रभाग क्रमांक ३० चे विद्यमान नगरसेवक आनंद रिठे यांनी महानगर पालिकेकडून टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात पैसे मागितले होते. सुर्वे यांनी पैसे न दिल्याने रिठे यांनी महापालिकेत अर्ज करुन त्यांच्या नगरसेवकपदाचा गैरवापर करुन १० जून रोजी त्यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवरील मोबाईल टॉवर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा फौजफाटा आणून काढून टाकला. तसेच टॉवरनंतर त्यांचे राहते घरदेखील पाडुन टाकणार आहे, अशी धमकी देऊन आनंद रिठे यांनी संजय सुर्वे यांनी मानसिक त्रास दिला. रिठे यांच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून व टेरेसवरील मोबाईल टॉवर काढल्याने त्यांना मानहानी सहन झाली. तसेच घर पाडण्याच्या चिंतेने संजय सुर्वे यांनी सोमवारी त्यांच्या इमारतीमधील पौर्णिमा सायकल नावाचे सायकल दुरुस्तीच्या दुकानाच्या छताचा दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय सुर्वे यांन आनंद रिठे यांनी मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले, अशी शशांक सुर्वे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.