एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नाही : शशी थरुर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 11:48 AM2019-09-22T11:48:48+5:302019-09-22T11:50:59+5:30
एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नसल्याचे मत काॅंग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी व्यक्त केले.
पुणे :एक भाषा एक देश हे धाेरण भारताच्या एकतेसाठी याेग्य नाही. 1965 मध्ये भारताने त्री भाषीय धाेरण अवलंबले आहे. एक देश एक भाषा धाेरण राबविल्यास भारतातील विविध भाषिक लाेकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे हाेईल. असे मत काॅंग्रेसचे खासदार नेते शशी थरुर यांनी व्यक्त केले.
पुण्यातील काॅंग्रेसभवन येथे आयाेजित केलेल्या ऑल इंडिया प्राेफेशनल काॅंगेसच्या बियाॅन्ड पाॅलिटिक्स या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश एक भाषा या धाेरणाबद्दल व्यक्तव्य केले हाेते. हिंदी हि संपूर्ण देशाची भाषा व्हावी असे ते म्हणाले हाेते. यावर बाेलताना थरुर म्हणाले, एक देश एक भाषा हे भारताच्या विविधतेसाठी तसेच एकतेसाठी याेग्य नाही. त्री भाषीय धाेरणाचा आपण अंगिकार केला पाहिजे. भाजपाचे राजकारण हे हिंदी, हिंदुत्व याच्या भाेवतीच चालते. त्यांना दक्षिण भारतामध्ये मते मिळत नाहीत. एक देश एक भाषा केल्यास भारतातील विविध भाषिक लाेकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे हाेईल.
काॅंग्रेसबद्दल बाेलताना ते म्हणाले, काॅंग्रेस हे एकात्मेबाबत बाेलते. गेल्या काही वर्षांमध्ये माॅब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर लाेकांमध्ये इतका बदल झाला की माॅब लिंचिंग करण्याची लाेकांमध्ये हिंमत आली. माॅब लिंचिंग करणारा आपला भारत नाही. हिंदू असल्याचा मला अभिमान आहे परंतु लाेकांचा जीव घेण्यास सांगणारा हिंदू धर्म माझा नाही. रामाच्या नावावर माॅब लिंचिंग करणं हा रामाचा अपमान आहे.
हिंदुत्वाच्या नावावर हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांनी विरोध केला की त्यांना पाकिस्तानात जाण्यास संगण्यात येते. भाजप जरी सत्तेत असलं तरी त्यांना सर्व भारतीयांचे समर्थन नाही. युपीए च्या काळात भारताची अर्थव्यवस्था प्रगती करत होती. मोदी मन की बात करतात, परंतु त्यांच्या अर्थमंत्री धन की बात करत नाहीत. भाजप कडून तोडण्याचे राजकारण केले जाते. असेच राजकारण पुढे ही चालले तर देशाची अवस्था बिकट होईल. असेही ते यावेळी म्हणाले.