पिंपरी: सूक्ष्म, लघू, मध्यम मंत्रालयामध्ये महाराष्ट्र राज्याच्या डायरेक्टरपदी निवड करण्याचे आमिष दाखवून एक कोटी सहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई मंत्रालयातील एका कक्ष अधिकाऱ्यासह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळकरनगर, पिंपळे गुरव, पुणे व मुंबई येथे २० सप्टेंबर २०२० ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
डॉ. आदित्य दगडू पतकराव (वय ३६, रा. जवकळनगर, पिंपळे गुरव, पुणे, मूळ रा. आंबेजोगाई, जि. बीड) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २६) फिर्याद दिली. विकास शिंदे (रा. पनवेल, नवी मुंबई), राजाराम शिर्के (कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई), श्रेया चौहान (रा. विक्रोळी, मुंबई), अजित दुबे (रा. नवी मुंबई) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूक्ष्म, लघू, मध्यम मंत्रालयामध्ये महाराष्ट्र राज्याच्या डायरेक्टरपदी निवड करून देतो, असे आमिष आरोपींनी दाखविले. त्यासाठी फिर्यादीकडून एक कोटी सहा लाख रुपये घेतले. भारत सरकारच्या मुद्रा चुकीच्या आणि बनावट पद्धतीने वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.